Fri, Jul 10, 2020 17:18होमपेज › Sangli › तरुणाच्या खूनप्रकरणी सूत्रधारासह दोघांना अटक

तरुणाच्या खूनप्रकरणी सूत्रधारासह दोघांना अटक

Last Updated: Nov 18 2019 1:29AM
सांगली : प्रतिनिधी

येथील बसवराज सिद्धाप्पा लद्दे (वय 20, रा. बापट मळा) या महाविद्यालयीन युवकाच्या खूनप्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार अमन खॉजा मोकाशी (वय 19) आणि सोहेल राजेसाहेब गलगले (वय 22, दोघे रा. संजयनगर, सांगली) या दोघांना अंकली येथे छापा टाकून अटक करण्यात आली. 

यापूर्वी संशयित रोहन रमेश काळे,  साहील सलीम शेख, मारुती लक्ष्मण फोंडे आणि एक अल्पवयीन अशा चारजणांना अटक केली होती.  मूख्य सूत्रधार अमन मोकाशी आणि सोहेल गलगले या दोघांना अटक केल्यानंतर आता या खून प्रकरणातील संशयितांची संख्या सहा झाली आहे. यामधील साहील हा पोलिसपूत्र आहे.

मृत बसवराज हा कॉलेज कॉर्नरजवळील एका महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला शिकत होता. मंगळवारी सायंकाळी त्याच्या काही मित्रांनी त्याला फोन करून नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर बोलावले होते. तिथे अन्य सहा-सात जण थांबले होते.  बसवराज तिथे येताच संशयितांनी त्याला पकडून लाथाबुक्यांनी  मारहाण केली होती. यावेळी मुख्य सूत्रधार अमन मोकाशी याने  बसवराजवर धारदार हत्याराने वार केले. मोकाशी याने केलेले वार वर्मी बसल्याने शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू असताना बसवराज याचा मृत्यू झाला होता. 

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. त्यानंतर काळे, शेख आणि फोंडे या तिघांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. 

खूनाचा सूत्रधार मोकाशी आणि गलगले या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू होता. अंकली येथे दोघे लपून बसल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना पकडले. वरील सर्व संशयितांकडून खून प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

चेष्टामस्करी असह्य झाल्याने खून?

बसवराज याच्या खूनप्रकरणी सर्व संशयितांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. त्याची सुधारगृहात रवानगी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बसवराज व त्याचे मित्र यांच्यामध्ये एका विषयावर चेष्टामस्करी सुरू होती. चेष्टामस्करी असह्य झाल्यानेच खून केला असावा, अशी चर्चा सुरू आहे.