Fri, Oct 30, 2020 18:30होमपेज › Sangli › कोरोनापुढे माणुसकीच्या भिंतीही ढासळल्या

कोरोनापुढे माणुसकीच्या भिंतीही ढासळल्या

Last Updated: Aug 12 2020 1:14AM

इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी सहकार्‍यांच्या समवेत मयत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले.इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनामुळे रक्‍ताची नातीही तुटत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. सोमवारी रात्री इस्लामपुरातही त्याचीच पुनरावृत्ती झाली. कोरोनावर उपचार सुरू असलेल्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेहाकडे पाठ फिरवली. शेवटी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी पुढाकार घेत पालिकेच्या अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना घेवून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कोरोना समोर रक्‍तातील नात्याच्या भिंतीही ढासळू लागल्या आहेत. 

कोरोनावर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा सोमवारी रात्री इस्लामपूरात मृत्यू झाला. प्रशासनाने त्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. ते रुग्णालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आली. पालिका प्रशासनावरही पहिल्यांदाच हा प्रसंग ओढवला होता.भीतीने स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. 

रात्री दहा - अकरा  वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार सुरू होता. घरी असलेल्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांचे मोबाईलवरील संभाषण ऐकून त्यांच्या पतींनी त्यांना धीर दिला. ‘मी, तुझ्याबरोबर स्मशानभूमीत येतो चल’, असे ते म्हणाले. पतीच्या पाठबळाने त्यांनाही बळ आले. त्या स्वतः तसेच उपमुख्याधिकारी प्रमिला माने, साहेबराव जाधव, दिलीप जाधव, दिलीप कुंभार, आनंद कांबळे, निलेश नांगरे, सागर कांबळे, नामदेव खोत, सूरज कांबळे, रोहित कांबळे आदी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक संग्राम पाटील  रात्री स्मशानभूमीत गेले. त्यांनी कर्मचार्‍यांना धीर दिला. त्यामुळे  कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. संपूर्ण विधिवत अंत्यसंस्कार होईपर्यंत मुख्याधिकारी पवार तेथे थांबून होत्या.

एकीकडे प्रशासनातील अधिकार्‍यांचीही संवेदनशीलता तर दुसरीकडे  रक्ताच्या नातेवाईकांच्यातील हरवलेली माणुसकी हे दोन्ही एकाचवेळी शहरवासीयांना यानिमित्ताने पाहायला मिळाले. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. माणुसकी, रक्‍तांची नाती याच्या पेक्षाही कोराना मोठा आहे का, असा सवालही  या निमित्ताने उपस्थित होतो.

शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी जोखीम घेवून पार पाडत आहे. मयत व्यक्‍तीच्या नातेवाईकांची काहीच जबाबदारी नाही का? मला अभिमान आहे की, आम्ही सर्वजण जबाबदार अशा शासकीय यंत्रणेचे घटक आहोत. कर्तव्या पलीकडे जावून सर्वजण समाजासाठी झटत आहोत.
- प्रज्ञा पवार 
मुख्याधिकारी, इस्लामपूर

 "