Fri, Sep 18, 2020 18:40होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात 1112 कोटींची द्राक्षे बागेतच

सांगली जिल्ह्यात 1112 कोटींची द्राक्षे बागेतच

Last Updated: Mar 26 2020 11:39PM
तासगाव : दिलीप जाधव

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे द्राक्षशेतीला फटका बसला आहे. याचा सर्वात मोठा अर्थिक फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना बसला आहे. द्राक्षाची बाजारपेठ बंद झाल्याने सुमारे 18 हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावरील अंदाजे 1 हजार 112 कोटी पेक्षा जास्त रुपयांची द्राक्षे अजून बागेतच आहेत. 

परिस्थिती जर अशीच राहिली तर द्राक्षशेती मोडीत निघणार आहे. आर्थिक अरिष्ट आल्याने बागायतदार हादरले आहेतच, पण त्याचा फटका औषध व खत विक्रेत्यांना सुद्धा बसणार आहे.

विक्रेत्यांनी कोट्यवधी रुपयांची औषधे व खते उधारीवर दिली आहेत. त्यांचे पैसे वसूल झाले नाहीत, तर त्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे. आपली उधारी कधी आणि कशी वसूल होणार? या काळजीने ते हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील शिराळा वगळता इतर नऊ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षबागा आहेत. एकूण द्राक्षबागांच्या लागवडीखालील क्षेत्र 74 हजार 232 एकरांच्या आसपास आहे. त्यापैकी 80 टक्के द्राक्षबागा तासगाव, मिरज आणि जत तालुक्यात आहेत.

यंदाचा हंगाम हा द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांसमोर संकट म्हणूनच आला आहे. गेल्या वीस वर्षांत पडला नव्हता तेवढा रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. पावसाने द्राक्षबागायतदारांचे 2 हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केले. त्या नैसर्गीक संकटापुढे न झुकता द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांनी उच्च दर्जाची द्राक्षे तयार केली. या वर्षी उत्पादन कमी असल्याने द्राक्षाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.  हंगामाच्या सुरू झाला तेंव्हा द्राक्षाला चांगला दर मिळालाही.

परंतु हंगामाच्या उत्तरार्धात द्राक्षशेती पुन्हा संकटात सापडली. सीएएच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर उत्तर भारतातील द्राक्षांची बाजारपेठ बंद झाली होती. त्याचा फायदा घेऊन व्यापार्‍यांनी दर पाडले. ही परिस्थिती थोडी सुधारून परत द्राक्षांचे दर आणि मागणी वाढू लागली असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले आहे.  कोरोना द्राक्षबागांसाठीही कर्दनकाळ ठरतो आहे. संचारबंदी लागू झाल्याने वाहतुकीवर बंदी आली. या हंगामात आता पुन्हा व्यापार सुरू करता येणार नसल्याने व्यापार्‍यांनी आपले घर गाठले आहे. सलग 21 दिवसांची संचारबंदी लागू झाल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी घरातून बाहेर पडू शकत नाहीत. बाहेर पडले तर वाहतूक बंद आहे. द्राक्षेसुध्दा तशीच बागेत राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत.

 "