वारणावती : वार्ताहर
वारणा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा यासह विविध मागण्यांसाठी आरळा (ता. शिराळा) येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात वारंवार खंडित व कमी दाबाने वीजपुरवठा होतो. कृषी पंपांना दिवसा 10 तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, वारणा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, जुनाट विद्युत खांब व धोकादायक पेट्या बदलण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांची पूर्तता करण्याचे व कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आरळा येथे 28 डिसेंबररोजी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन अधिकार्यांनी दिले.
त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे बाळासाहेब नायकवडी व पाटील यांनी जाहीर केले. बाळासाहेब कांबळे, सावळा पाटील यांची भाषणे झाली. राजू वडाम, बाबुराव नांगरे, शिवाजी पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह कोकरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे उपस्थित होते.