Fri, Apr 23, 2021 13:25
सांगलीत लसीकरण ठप्प

Last Updated: Apr 08 2021 2:05AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

लसींचा साठा संपल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे लसीकरण थांबले आहे. शासनाकडून लस येण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे  आरोग्य खाते हतबल झाले आहे.

मोठ्या प्रमाणात साठा असताना लोक लस घ्यायला तयार नव्हते. प्रशासन दारात जाऊन सांगत होते; पण लोक भीतीपोटी लस घेत नव्हते. तसेच शासनाची यंत्रणाही कमी पडत होती. परंतु; कोरोना वाढू लागल्याने लोकांची लस  घेण्याची मानसिकता तयार झाली. तसेच प्रशासनानेही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सोय केल्याने लसीकरण वेगाने होऊ लागले. दररोज 20 हजार लोकांना लस दिली जाऊ लागली.

गेला आठवडाभर लसीकरण मोठ्या गतीने झाले. परिणामी लस कमी पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्हा आरोग्य खात्याने तातडीने शासनाला  कळविले. आरोग्य अधिकार्‍यांनी पाठपुरावा केल्याने मागील आठवड्यात 50 हजार डोस आले; पण तेही संपले. मंगळवारी संध्याकाळी केवळ दहा हजार लसीचे डोस शिल्लक होते. 

आज दिवसभरात विविध केंद्रावर लसीचा साठा अत्यंत अपुरा होता. त्यामुळे काहींना लस मिळाली. अनेकांना  लस न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. जिल्हा आरोग्य खात्याने दोन दिवसांपूर्वीच प्रस्ताव पाठवून लसीची मागणी केली आहे.

पण शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. लस आल्यानंतर पाठवितो, असे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले आहे. दोन-चा दिवसात लस येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

एप्रिलअखेरपासून धोकादायक स्थितीला सुरुवात 

सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत चालली आहे. पुढील 15 दिवसांत यात आणखी वाढ होण्याची भीती आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत स्थिती धोकादायक होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य खात्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यानंतरचा पुढील मे व जून महिन्यात रुग्ण संख्या उच्चांकी पातळीवर जाण्याचा धोका आहे.लसीकरण सुरळीत सुरू राहिले तर परिस्थिती आटोक्यात राहिल, अन्यथा मोठा उद्रेक होण्याची  भिती व्यक्त होते आहे.