Tue, Mar 09, 2021 16:08
सांगली : तासगाव गोटेवाडी रोडवर अपघात, दोघे ठार, एक जखमी

Last Updated: Jan 16 2021 11:31PM
मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा

तासगावहून पेड गावाकडे जात असताना तासगाव गोटेवाडी रोडवर अपघात झाला. हा अपघात तासगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर झाला असून दुचाकी रस्त्यालगतच्या कॅनोलला धडकल्याने दोघे जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. तेजस महिपती नलवडे आणि राहुल शामराव माळी (दोघे ही रा.पेड ता. तासगाव) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर अजय उत्तम माळी असे जखमीचे नाव आहे. याबाबत रात्री उशिरा पोलिसांकडून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तेजस नलवडे, राहुल माळी आणि जखमी अजय माळी हे तिघे कामानिमित्त तासगावला गेले होते. शनिवारी रात्री ते तासगावहून पेडला जात असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते गोटेवाडी जवळ पोहचले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी कॅनॉलच्या भिंतीवर जोरदार धडकली. या धडकेत नलवडे आणि  माळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय माळी जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास तासगाव पोलिसांकडून केला जात आहे.