Mon, Aug 10, 2020 04:45होमपेज › Sangli › ट्रॅव्हल्स बस उलटून तीन ठार; वीस जखमी

ट्रॅव्हल्स बस उलटून तीन ठार; वीस जखमी

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 11:26PM

बुकमार्क करा
नागज : वार्ताहर

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स बस उलटून  भीषण अपघात झाला. त्यात तिघे जण जागीच ठार झाले, तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाले. हा अपघात  शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजजवळ झाला.

हीना जमीर शेख (वय 25), त्यांची चिमुकली मुलगी सुबाजिना जमीर शेख (वय 1 वर्ष, दोघीही रा. सोलापूर) आणि एक अनोळखी पुरुष जागीच ठार झाले. रज्जाक अमीन सय्यद (वय 46), नजमा रज्जाक सय्यद (वय 35, दोघे रा. सोलापूर), प्रवीण दशरथ शिंदे (वय 29, रा. मोहोळ), संजित देहुरी (वय 29), इब्राहिम देहुरी (वय 25, रा. ओरिसा) व चालक सत्यवान मोतिराम चोरगे (वय 38) हे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये अन्य चौदा जणांचा समावेश आहे. 

 दीपकराज ट्रॅव्हल्स (एमएचसीव्ही 727) ची बस कोल्हापूरहून सोलापूरला निघाली होती. नागज फाट्याच्या उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर भरधाव बसचा चालक समोरील ट्रकला ओव्हरटेक करीत होता. त्यावेळी  बसने जोरात हेलकावा घेतला. बसची पुढची दोन्ही चाके पाट्यासहित निखळून पडली. त्यामुळे गाडी डाव्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली.

या अपघातात गाडीचा पुढचा तसेच डावीकडच्या भागाचा चक्‍काचूर झाला. खिडक्यांच्या  फुटलेल्या काचा, प्रवाशांच्या चपला, साहित्य गाडीच्या बाहेर पडले होते. घटनास्थळी जखमींचा  आक्रोश काळीज  पिळवटून टाकणारा होता.          

नागजचे पोलिस पाटील दीपक शिंदे,माजी उपसरपंच तानाजी शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन व्हसमाळे पोलिसांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

ग्रामस्थांच्या  मदतीने पलटी झालेली बस उभी करून आतील मृतदेह बाहेर काढण्यात आले.केबीनमध्ये बसलेल्या हिना,त्यांची मुलगी सुबाजिना व एक  पुरूष जागीच ठार झाले. गाडी एका बाजूला पलटी झाल्याने  सुमारे वीस प्रवासी जखमी झाले.जखमीपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.त्यांना मिरज येथील शासकीय रूग्णालयात  दाखल केले आहे.अन्य जखमींना कवठेमहांकाळ तसेच सांगोल्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.मिरजेत दाखल करण्यात आलेले जखमी : रज्जाक सय्यद (वय 46),प्रवीण शिंदे (वय 30),सत्यवान चोरगे (वय 38),सौजित दुहेरी (वय 19), नजमा सय्यद (वय 50, सर्व रा. जि. सोलापूर)