Wed, Aug 12, 2020 09:34होमपेज › Sangli › सांगली : मोराळेत भोंदूबाबाला अटक

सांगली : मोराळेत भोंदूबाबाला अटक

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:47PM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी 

मोराळे (ता.तासगाव) येथे  भालचंद्र भिकाजी पाटील या  भोंदूबाबाला तासगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. भूतबाधा काढतो म्हणून लोकांची फसवणूक करणे तसेच स्वतःकडे दैवी शक्ती आहे, असे सांगून दरबार भरवून महिलांचा छळ करणे अशा तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या भोंदुबाबाचा पर्दाफाश केला. 

याप्रकरणी  पाटील  याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव शंकर जाधव (वय 52, रा. वासुंबे) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी न्यायालयाने पाटील याला दोन दिवसांची पोलिस कोठडी  दिली.

 तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी  दि. 26 नोव्हेंबर रोजी जाधव यांना निनावी फोन आला की, मोराळे येथे भालचंद्र पाटील नावाची व्यक्ती भूत उतरवण्याचा दरबार भरवते. त्याबद्दलचे सर्व व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या फारूक गवंडी, अशोक मस्के, अमर खोत, प्रा. वासुदेव गुरव, पांडुरंग जाधव, डॉ. विवेक गुरव, दीपक कांबळे, शरद शेळके, लक्ष्मण रणवरे, कुंदन सावंत यांनी ते व्हिडीओ पाहिले.

बुधवारी (दि. 29) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील  तासगाव येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आला होता. त्यावेळी अंनिसच्यावतीने नांगरे- पाटील यांना  निवेदन देण्यात आले होते. 

पाटील  स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवतो. दरबारात आलेल्यांची  भूतबाधा मंत्राच्या सहाय्याने काढण्याचा दावा करतो. बाधित महिलांचा छळ करतो अशा तक्रारी करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याबाबत  उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांना त्वरित  कारवाई करण्यास सांगितले.

गुरूवारी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे, सहायक पोलिस फौजदार थोरवडे, हेड कॉन्स्टेबल वंडे, पोलिस नाईक भोळे, माने, पोलिस  कुडचीकर  अंनिसच्या कार्यकर्त्यांसमवेत मोराळे येथे 
गेले. त्यावेळी  पाटील याचा दरबार सुरू होता. त्याच्यासमोर एक बाधित महिला बसली होती. पोलिस व अंनिस कार्यकर्त्यांनी ‘ही अंधश्रध्दा आहे, हा भोंदूगिरी करतो’, असे सांगितले.  तेथे जमलेल्या लोकांनीही त्याला दुजोरा दिला. पाटील  म्हणाला, मी कोणतेही अंधश्रध्देचे काम करीत नाही. मला दैवीशक्ती प्राप्त आहे. पोलिसांनी पाटील याला ताब्यात घेतले. त्याला तासगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी समर्थनासाठी  भक्तांची मोठी गर्दी झाली होती.पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे  तपास करीत आहेत.