Mon, Aug 10, 2020 04:58होमपेज › Sangli › पैसे भरुनही पाणी मिळेना; शेतकर्‍यांचा ठिय्या 

पैसे भरुनही पाणी मिळेना; शेतकर्‍यांचा ठिय्या 

Published On: Apr 02 2019 3:32PM | Last Updated: Apr 02 2019 3:23PM
तासगाव : प्रतिनिधी

बस्तवडे (ता. तासगाव) येथील शेतक-यांनी पुणदी उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे यासाठी तीन महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. मात्र सातत्याने मागणी करून देखील अधिकारी पाणी पाणी देत नाहीत. संतप्त शेतकर्‍यांनी सोमवारी तासगावातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. 

शेतक-यांनी पाणी येाजनेच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. गरजेच्या वेळी पाणी देत नसाल तर मगं काय द्राक्षबागा जळाल्यावर देणार आहात काय ? असा प्रश्‍न उपस्थित करून दोन दिवसांत पाणी दिले नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

बस्तवडे भागातील द्राक्षांच्या खरड छाटणीची तयारी पूर्ण झाली आहे. पाण्याअभावी छाटण्या खोळंबलेल्या आहेत. सोमवारी शेतकर्‍यांनी थेट कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. शेतक-यांनी संबंधित अधिकारी येईपर्यंत कार्यालयासमोर ठिय्या मारला. 

दोन तासानंतर अधिकारी कार्यालयात आले. संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. दिनकर पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, शहाजी पाटील, धनाजी भोसले. चंद्रकांत पाटील, विलास कोळी, बाळासो भोसले, विजय साळुखे, बजरंग पाटील, पंडीत भोसले, हिंदूराव पाटील, प्रकाश गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.