‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टींचे जयंत पाटलांच्या राजारामबापू साखर कारखान्या समोर आत्मक्लेश आंदोलन

Last Updated: Mar 08 2021 4:20PM
Responsive image
इस्लामपूर : पुढारी ऑनलाईन 

सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहेत. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली असतानाही सर्व साखर कारखानंदारांनी एक होऊन शेतक-यांना लुबाडण्याचे कारस्थान रचले आहे. यामुळे या कारखांनदारांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी. अन्यथा पुढील आठवड्यापासून सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलनास सुरवात होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेटटी यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे राजारामबापू यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, कुरळप, कासेगांव , पलूस, सांगली ग्रामीण, विश्रामबाग या पोलिस ठाण्यामघ्ये २५० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यामुळे सकाळपासून परिस्थीती तणावपूर्ण झाली होती. प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन मोडून काढण्याचा डाव साखर कारखांनदारांच्या इशा-यावर पोलिसांमार्फत करण्यात आला होता. यामुळे स्व:त राजू शेट्टी यांनी आपले दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द करून पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत थेट राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केले. 

यावेळी बोलताना शेटटी म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्यात अनुदान व साखर दरवाढीचे कारण पुढे करून साखर कारखांनदार शेतक-यांची पिळवणूक करत आहे. जर साखर धंद्यामध्ये एवढ्या अडचणी निर्माण झाल्या असतील तर साखर संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व कारखांनदारांनी केंद्राच्या विरोधात आंदोलन करायला हवे. राज्यातील कारखांनदार ईडीला घाबरत असल्याने अन्यायाविरोधात लढण्याची त्यांची हिम्मत नाही. यामुळे येत्या १५ दिवसात कारखांन्यानी सर्व एक रक्कमी एफआरपी खात्यावर जमा न केल्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात पुढील उग्र आंदोलन होणार आहे. 

दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी माहुली यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात एफआरपीचे एक रक्कमी सर्व पैसे देण्याची हमी दिली.