Sat, May 30, 2020 11:41होमपेज › Sangli › ऊसदराकडे उत्पादकांची ’नजर‘ 

ऊसदराकडे उत्पादकांची ’नजर‘ 

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
इस्लामपूर : मारूती पाटील
चालू गळीत हंगाम कधी सुरू होणार? उसाला दर किती मिळणार? ऊस दरासाठी शेतकरी संघटना आंदोलन करणार काय, याकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची नजर लागून राहिली आहे.  यावर्षी अतिवृष्टीमुळे गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. तर अद्यापही अवकाळी पाऊस होत असल्याने  हंगाम कधी सुरू होईल याबाबत अनिश्चितता कायम आहे. 

प्रत्येकवर्षी ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी नोव्हेंबर निम्यावर आला तरी पावसामुळे हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. पाऊस कधी थांबतोय व गळीत हंगाम कधी सुरू होतोय याकडे ऊस उत्पादक तसेच  ऊसतोडणी मजूर डोळे लावून बसलेला आहे.  

यावर्षी महापूर व अतिवृष्टीमुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा एकरी उत्पादनला फटका बसणार आहे. तसेच मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे. त्यामुळे ‘एफआरपी’ वाढून मिळावी, अशी मागणी होत आहे. मात्र जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गतवर्षीची ‘एफआरपी’ दिलेली नाही. त्यामुळे दराबाबत शेतकर्‍यांना उत्सुकता आहे. यापूर्वी हंगामाच्या तोंडावर ऊस दर आंदोलनाचे रणशिंग फुंकले जायचे. यावर्षी मात्र सारेच शांत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद दि. 23 रोजी होत आहे. याकडे सार्‍याचे लक्ष लागले आहे.

उत्पादन खर्चावर दर हवा
रासायनिक खते, मशागतींचे दर, मजुरीचे दर वाढतच आहेत. त्याप्रमाणात उसाचा दर मात्र वाढताना दिसत नाही. वाढत्या उत्पादन खर्चामध्ये ऊस शेती न परवडणारी ठरत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या आधारावर उसाला भाव मिळावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.