Wed, Aug 12, 2020 09:14होमपेज › Sangli › जि. प. शाळांत 2 हजार विद्यार्थी घटले

जि. प. शाळांत 2 हजार विद्यार्थी घटले

Published On: Mar 15 2018 1:27AM | Last Updated: Mar 15 2018 1:27AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या 1701 पैकी 1698 प्राथमिक शाळांची संचमान्यता निश्‍चित झाली आहे. उपशिक्षक, पदवीधर शिक्षकांची 6431 पदे मंजूर असून 5806 पदे कार्यरत आहेत. 625 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या 2 हजाराने घटली आहे. 1698 शाळांमध्ये 1 लाख 23 हजार 793 विद्यार्थी आहेत. तीन शाळांची संच मान्यता व्हायची आहे. 

जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता रखडली होती. रिक्त-अतिरिक्त शिक्षक संख्या निश्‍चितीअभावी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रखडले होते. त्यामुळे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतही अडथळे आले. दरम्यान शासनाने स्वतंत्र परिपत्रक काढून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. 

प्राथमिक शाळांची संच मान्यता बरेच दिवस ‘ड्राफ्ट मोड’वर होती. ती आता अंतिम झाली आहे. शिक्षकांची मंजूर पदसंख्या 6 हजार 431 आहे. यामध्ये उपशिक्षक 5 हजार 24, पदवीधर शिक्षक 1 हजार 49, मुख्याध्यापक पदे 358 आहेत. सध्या कार्यरत शिक्षक संख्या 5 हजार 806 आहे. यामध्ये 4 हजार 645 उपशिक्षक, 931 पदवीधर शिक्षक, 230 मुख्याध्यापक आहेत. उपशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापकांची 625 पदे रिक्त आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दि. 30 सप्टेंबर 2016 रोजीच्या पटानुसार 1 लाख 26 हजार विद्यार्थी होते. जानेवारी 2018 मध्ये 1698 शाळांची पटसंख्या 1 लाख 23 हजार 793 आहे. तीन शाळांची संच मान्यता अंतिम झालेली नाही. या तीन शाळांकडील विद्यार्थी संख्या दोनशे ते तीनशेच्या दरम्यान असेल, असे सुत्रांनी सांगितले. 

शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि म्हणाले, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालातून ते स्पष्ट झालेले आहे. खासगी शाळांनाही सध्या कमी पटाची समस्या जाणवत आहे. त्याची कारणे अनेक आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता आणखी वाढावी, विद्यार्थी संख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रभावी कामकाज होईल.