Thu, Jul 02, 2020 18:32होमपेज › Sangli › मनपा बरखास्तीसाठी शिवसेनेचे धरणे

मनपा बरखास्तीसाठी शिवसेनेचे धरणे

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Feb 28 2018 10:14PMसांगली : प्रतिनिधी

योजनांच्या नावे लूट आणि पाणीपुरवठा, कर्मचारी भरती, एलबीटी वसुलीच्या नावे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट कारभार झाला आहे. यामुळे जनतेच्या कररूपी निधीतून भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेली महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी बुधवारी शिवसेनेने महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन करीत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकरणी सखोल चौकशी करून आयुक्‍तांनाही या प्रकरणी निलंबित करावे, अशी मागणी केली. 

यासंदर्भात अनिल शेटे म्हणाले, महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, 41 नगरसेवक निवडून आले होते. मात्र चार वर्षांत या नगरसेवक व  प्रशासनाने  भ्रष्ट कारभार केला आहे. सर्वच विभागांना भ्रष्टाचाराचे कुरण बनवून निव्वळ लुटीचाच धंदा उघडला आहे. मानधनावरील कामगार भरती असो, एलबीटी, बांधकाम विभाग प्रत्येक विभागात बोगसगिरी सुरू आहे. मानधनावर 60 वर्षांवरील कामगारांना राबविले जाते. सफाई कामगारांची बोगस हजेरी लावून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे.

ते म्हणाले, शहराला गढूळ पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आरोग्याच्या साथी पसरल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या शुध्दीकरण यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गोलमाल आहे. डास फवारणी देखील होत नाही. बोगस औषधे खरेदी सुरू आहे.

जितेंद्र शहा म्हणाले, चार वर्षे शहराला खड्ड्यांत घालून निवडणुकीच्या तोंडावर रस्तेकामाचा फार्स सुरू आहे. निवडणुकीसाठी रस्तेकामांच्या नावे ‘टक्केवारी’ चा बाजार फोफावला आहे. तीन वर्षांची वॉरंटी सांगून वडाप काम सुरू आहे.  

शहा म्हणाले, नगरसेवक व प्रशासनाने महापालिकेची केवळ लूट केली आहे. याला साथ देणारे आयुक्‍तही गैरकारभारास जबाबदार आहे. या सर्वांची भांडणे ही टक्केवारीसाठी असतात. शहरात भूखंड घोटाळे झालेत, अतिक्रमणे आहेत. त्याबाबत आयुक्‍तांसह पदाधिकार्‍यांचे मौन का आहे? या सर्वांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनविले आहे. त्यामुळे अशी कलंकित महापालिका शासनाने बरखास्त करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

यावेळी सचिन ढेरे, अक्षर सुतार, महावीर चंदनशिवे, बालाजी खुराडे, सुनील पवार, अजय माने, स्वप्निल पाटील, नितेश कांबळे, विजय माने, वासुद गोले आदी उपस्थित होते. 

भ्रष्टाचाराचे ढीगभर पुरावे; तरीही लोकप्रतिनिधी गप्प
 शहा म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांत त्याच त्या कारभार्‍यांनी महापालिकेत शेकडो भ्रष्टाचार केले. याबद्दल विशेष लेखापरीक्षण आणि लेखापरीक्षणातून ताशेरे ओढले आहेत. त्याच्या वसुलीसाठीही शासनाचे आदेश झाले आहेत. पण त्याबाबत आयुक्‍त काहीच अंमलबजावणी करीत नाहीत. दुसरीकडे खासदार, आमदारांसारखे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. किमान राजकीय हेतूपोटी तरी याप्रकरणी कारवाई करून शहराचे नुकसान टाळावे.