Fri, Nov 27, 2020 11:22होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात आजपासून होणार शाळा सुरू

सांगली जिल्ह्यात आजपासून होणार शाळा सुरू

Last Updated: Nov 22 2020 11:52PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सोमवार (दि. 23) पासून  शाळांमधील नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शाळांकडून तयारी करण्यात आली आहे.  दीड लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे शाळांना आलेली आहेत. जिल्ह्यातील साडेसहा हजारांवर  शिक्षक, शिक्षकेतरांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 30 शिक्षक पॉझिटिव्ह आलेले आहेत.  

राज्य सरकारने सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध केला आहे. सरकारनेही स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याबाबतीत निर्णय घेण्याची जबाबदारी टाकलेली आहे. काही जिल्ह्यात शाळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळाबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.  मात्र, जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 750 शाळा आहेत. या वर्गांमध्ये 1 लाख 47 हजार 486 विद्यार्थी आहेत. त्यापैकी सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्रे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिली आहेत. या 750 शाळांकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संख्या 8 हजार 456 आहे. जिल्ह्यातील साडेसहा हजारांवर  शिक्षक, शिक्षकेतरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 30 शिक्षक पॉझिटिव्ह आलेले आहेत.  

शासन निर्देशानुसार सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यासंदर्भात तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची चाचणी करण्यासंदर्भात सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे  शाळांनी परिसर वर्ग खोल्या निर्जंतुकीकरण, बैठक व्यवस्था शारीरिक अंतर आणि पालकांची लेखी संमत्ती आदी नियमांची   अंमलबजावणी केली आहे.   

सांगली महापालिका क्षेत्रातील 110 शाळा सुरू होणार आहेत. यासाठी आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशाने आरोग्य विभागामार्फत सर्व शिक्षकांच्या रॅपिड टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासण्या केलेल्या आहेत.  शिक्षण विभागाकडून निर्जंतुकीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.