'सांगलीत पूरग्रस्तांची कीट आली ६५ हजार; वाटली केवळ १५ हजार'

Last Updated: Oct 10 2019 9:29PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

Responsive image

सांगली : प्रतिनिधी

सांगलीत पूरग्रस्तांना वाटण्यासाठी राज्यभरातून जवळपास 65 हजार कीट आली, पण यातील जनतेला केवळ 15 हजार मिळाली. चांगले साहित्य महापालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या घरी गेले, असा आरोप सांगली सुधार समितीने केला.

याबाबत माहिती देताना अ‍ॅड. अमित शिंदे, जयंत जाधव म्हणाले, पुराचा मोठा फटका सांगलीत असल्याने राज्यभरातून मदतीचा प्रचंड ओघ याठिकाणी आला. यातील अनेक ट्रक भाजपधार्जिण्या काही संघटनांनी आपल्याकडे वळवून नेले. प्रशासनाकडे जवळपास 65 हजारहून अधिक कीट जमा झाली. यात अनेक प्रकाराचे दर्जेदार व चांगले साहित्य होते. परंतु, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी यातील चांगले साहित्य आपल्या घरी नेले. कीटमध्ये दर्जाहिन व कमी माल ठेवला.

तसेच यातील केवळ 15 हजार कीट जनतेला वाटली. सुमारे 50 हजार कीटचा हिशोब लागत नाही. याबाबत आम्ही माहिती अधिकारात विचारणा केली असता टाळाटाळ केली जात आहे. रिलायन्स कंपनीने दिलेली चांगली कपडे, बेडशीट, चादरी, मिक्सर, कुकर असे अनेक साहित्य अधिकार्‍यांच्या पळवून नेले.काही कीटस् निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वाटप केले आहे असा आरोपही त्यांनी केला. 

त्यांनी पुढे सांगितले की, या कीटचा हिशोब महापालिकेने तातडीने द्यावा, अन्यथा समिती आंदोलनाबरोबर कायदेशीर लढा देईल. या वेळी महालिंग हेगडे, सुधीर नवले, राजेंद्र पाटील, रमेश डफळापुरे, मयूर लोखंडे,  बाबासाहेब पुणेकर उपस्थित होते.