सांगलीच्या क्रिकेटला गतवैभव देऊ 

Last Updated: Jul 10 2020 10:18PM
Responsive image


सांगली : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेटपटूंनी सांगलीचे नाव अजरामर केले आहे. यापुढे सांगलीच्या क्रिकेटला आलेली मरगळ झटकून गतवैभव मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून विशेष अभियान राबवू, असा निर्धार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बजाज यांनी व्यक्त केला.  

दैनिक ‘पुढारी’ च्या सांगलीच्या क्रिकेट इतिहास व वाटचालीवर प्रकाशझोत टाकणार्‍या विशेषांकाचे येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. सदोदित क्रीडाक्षेत्राला चालना देणार्‍या दैनिक ‘पुढारी’ ने पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रिमीयर लीगच्या माध्यमातून क्रिकेटचा महाप्लॅटफॉर्म उभारला आहे असेही बजाज म्हणाले.

पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, युवानेते सम्राट महाडिक, शिवसेना नेते शेखर माने, नगरसेवक अभिजित भोसले, प्रकाश मुळके, नगरसेविका पवित्रा केरिपाळे, युवानेते विज्ञान माने, आदिनाथ मगदूम, विजय खेत्रे, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अनिल जोब, माजी नगरसेवक हरिदास पाटील, युसूफ जमादार, चेतन पडियार, राहुल आरवाडे आदी उपस्थित होते.

सम्राट महाडिक म्हणाले, पुढारीने ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचे  क्रिकेटचे टॅलेंट शोधून त्यांना संधी मिळावी यासाठी प्रीमियर लीग सुरू केली आहे.  गेल्या आठ वर्षांत या लीगमधून अनेक खेळाडू  घडले आहेत. 

क्रिकेटपटू सुनील गावसकर वाढदिनाचे औचित्य

बजाज म्हणाले, आज महान भारतीय  क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा वाढदिवस आहे. त्यांचे औचित्य साधून पुढारीने क्रिकेट पुरवणी प्रकाशित केली आहे. यामध्ये त्यांच्या सांगलीतील खेळीच्या इतिहासावरही प्रकाशझोत टाकला आहे. हा एक सुवर्णयोग आहे.