Wed, Aug 12, 2020 21:10होमपेज › Sangli › उत्कंठा...धाकधूक अन् हुरहूर!

उत्कंठा...धाकधूक अन् हुरहूर!

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 8:17PMसांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. 3) होणार आहे. त्यानिमित्ताने उमेदवार, समर्थकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता मतमोजणीच्यादृष्टीने काऊंटडाऊन सुरू झाले आहे. कोणाला संधी, कोणाला झटका बसणार याची धाकधूकही वाढली आहे. काही प्रभागांमध्ये निकालाचे अंदाजही ठरू लागले आहेत. मात्र, काही ठिकाणी अधिकच ‘टशन’ असल्याने अंदाज येणे मुश्किल आहे. त्यादृष्टीने उमेदवारांसह समर्थकांचे ‘टेन्शन’ही वाढले आहे. एकूणच यादृष्टीने आता मतदार, समर्थकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, पैजाही रंगू लागल्या आहेत.

या निवडणुकीत सर्वांनीच ‘साम, दाम, दंड’ नीती अवलंबिली आहे. प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. परंतु मतदारांतील उदासीनतेने गत निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का मतदान घसरले आहे. त्यामुळे आता मतमोजणीचे अंदाज वर्तवले जावू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद मोठी असल्याने त्यांच्या अधिक जागांवर उमेदवार विजयी होतील, असे अंदाज सुरू आहेत. परंतु महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा सत्ताधारी असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसेल, भाजप नव्या दमाने समोर आल्याने पर्याय म्हणून काही जागांवर विजयी होईल, असेही आडाखे बांधले जात आहेत. 

प्रभाग 1 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून धनपाल खोत, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी उपमहापौर सौ. पद्मश्री पाटील व रईसा रंगरेज यांचे दमदार पॅनेल असल्याचे बोलले जाते. त्यांच्यासमोर भाजपनेही विश्‍वजित पाटील यांच्यासह चौघांचे पॅनेल उभे केले आहे. पै. दिलीप सूर्यवंशी यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे स्वाभिमानी विकास आघाडीतून उपमहापौर विजय घाडगे यांच्या पॅनेलने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता आहे. 

प्रभाग 3 मध्ये भाजपकडून नगरसेवक पुत्र संदीप आवटी, सौ. शांता जाधव, सौ. अनिता व्हनखंडे, शिवाजी दुर्वे यांचे प्रबळ पॅनेल आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने सचिन जाधव यांच्या पॅनेलचे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेही सज्जाद भोकरे, सौ. श्‍वेता गव्हाणे आदींचे पॅनेल उभे केले आहे. यामध्ये वेगवेगळ्या समीकरणानुसार वेगवेगळे निकाल लागतील, अशी चर्चा आहे. 

प्रभाग 4 मध्ये पांडुरंग कोरे, निरंजन आवटी यांच्या पॅनेलसमोर आघाडी पुरस्कृत अनिल कुलकर्णी यांच्या पॅनेलचे आव्हान आहे. तेथेही उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रभाग 5 मध्ये आघाडीचे संकेत मोडित काढत काँग्रेस-राष्ट्रवादीने  मैत्रीपूर्ण लढत म्हणत ‘आर या पार’ची लढाई बनविली आहे. यामध्ये गटनेते किशोर जामदार पुत्र करण जामदार यांच्यासमोर  माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी आव्हान उभे केले आहे. एकमेकांचा शह देण्यासाठी मिरजेत अन्य प्रभागातही याच पद्धतीने खेळी झाल्या आहेत. प्रभाग 6 नायकवडीपुत्र अतहर नायकवडींसमोर नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांनी आव्हान उभे केले होते. याला उघडपणे किशोर जामदार यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निकालाकडेही लक्ष लागून लागले आहे. प्रभाग 7 मध्ये  खुद्द किशोर जामदार यांनाच भाजपने गणेश माळी यांच्यारूपाने आव्हान देण्याची व्यूहरचना केली होती. सोबतीला स्थायी सभापती बसवेश्‍वर सातपुते यांना आनंदा देवमाने, तर काँग्रेसचे विशाल कलगुटगी यांच्या मातोश्री नगरसेविका धोंडीबाई कलगुटगी यांच्यासमोर नगरसेविका संगीता खोत यांचे आव्हान आहे. त्यामुळे तुल्यबळ लढतीत कोणाचा पराभव, कोण विजयी याची चर्चा जोरात आहे. 

प्रभाग 8 मध्ये आघाडीचे विष्णू माने, रवींद्र खराडे, स्नेहा औंधकर यांच्यासमोर भाजपचे विशाल मोरे, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर यांचे तगडे आव्हान होते. त्यामुळे तेथेही आघाडीला  मार्ग सोपा नाही, असे मतदानातून दिसून आल्याची चर्चा आहे. प्रभाग 9 मध्ये तर मदनभाऊ निष्ठावंतांचीच लढाई जुंपली आहे. नगरसेवक संतोष पाटील विरुद्ध मदनभाऊ निष्ठावंत अतुल माने यांच्यात आर या पारची लढाई झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक मनगू सरगर यांना पुतण्या भूपाल ऊर्फ बंडू सरगर यांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. या पॅनेलला उद्योजक सुशील हडदरे यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे या लढाईतही मोठे टशन आहे. त्यामुळे कोणाची बाजी होणार, याकडे सर्वांची उत्कंठा लागून राहिली आहे. प्रभाग 10 मध्ये आघाडी व भाजपला अपक्ष नरेंद्र तोष्णीवाल, अशोक मासाळे यांच्या पॅनेलचे तगडे आव्हान  होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण जिंकणार याचीही उत्कंठा लागून राहिली आहे. प्रभाग 11 हा काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांचा बालेकिल्ला आहे. तेथे काँग्रेसकडून उमेश पाटील यांच्या पॅनेलसमोर माजी नगरसेवक शीतल पाटील, सुरेश आटपाडे यांच्या अपक्ष पॅनेलने तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे तेथेही उलट-सुलट चर्चेला उधाण आहे. या निकालातून  त्या भागातील  वर्चस्वाचाच फैसला होणार आहे. प्रभाग 12 हा पैलवान दिलीप सूर्यवंशी यांच्यारूपाने भाजपचा गड आहे. पण तेथे आघाडीचे अजित सूर्यवंशी, स्वाभिमानीचे विशाल पवार, तर शिवसेना नेते शेखर माने यांनी पॅनेल उभे करून अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण केला आहे. त्यामुळे त्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रभाग 13 हा आघाडीवर मोठा आघात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत भाजपला फायद्याची की तोट्याची हे ठरवणारी आहे. या अटी-तटीच्या लढतीत भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्य पाटील यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या  अत्यंत चुरशीची लढाई आहे. विद्यमान नगरसेवक दिलीप पाटील यांच्या जोडीला उद्योजक अशोक पवार यांच्या पत्नी सौ. शुभांगी पवार, महाबळेश्‍वर चौगुले यांचे मजबूत बळ आहे. राष्ट्रवादीचे या लढतीत हरिदास पाटील यांचेही अस्तित्व पणाला लागले आहे. या प्रभागाच्या निकालातून तिन्ही पक्षांचे गावातील एकाचे प्राबल्य तर दोघांचे राजकीय अस्तित्व निकाली ठरणार आहे.

प्रभाग 14 हा माजी आमदार संभाजी पवार यांचा बालेकिल्ला आहे. पण तेथे संभाजी पवार, युवानेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार भाजपमधून बाहेर गेल्यानंतर होणारी ही लढाई त्यांच्या महापालिका क्षेत्रातील वर्चस्वाची बनली होती. तेथे नगरसेवक युवराज बावडेकर यांचेही अस्तित्व पणाला लागले आहे. या लढाईतील दोन्ही गटाचे उमेदवार संभाजी पवार गटाशी संबंधितच आहेत. त्यामुळे या निकालातून गावभाग कोणाकडे याचा फैसला होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे काँग्रेसचे युवानेते संजय (चिंटू) पवार, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, शैलजा कोरी, प्रियांका सदलगे यांनीही आव्हान उभे केले आहे. शिवाय अपक्ष अशोक शेट्टीही मैदानात होते. एकूणच या लढतीत कशी मतविभागणी होते, यावर वर्चस्वाचा निकाल होणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता पणाला लागली आहे. शिवाय निकालानंतर काय होणार, यावर मतदारांचेही ‘टेन्शन’ वाढले आहे.

प्रभाग 15 मध्ये आघाडीचे मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, पवित्रा केरिपाळे तर भाजपकडून रणजित सावर्डेकर, पापा बागवान, विक्रम सावर्डेकर यांच्या पत्नी सोनाली सावर्डेकर यांच्यात लढत अटी-तटीची झाली आहे. खासदार संजय पाटील यांची या लढतीतून प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभाग 16 तर महापौर हारुण शिकलगार यांच्या  अस्तित्वाचा फैसला करणारा ठरणार आहे. अपक्ष म्हणून माजी नगरसेवक राजेश नाईक, आसिफ बावा, गजानन हुलवाने यांचे तगडे आव्हान आणि त्यातून मतविभागणीवर त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. खुल्या गटातून उत्तम साखळकर, श्रीकांत शिंदे व उमर गवंडी यांच्यातही मतविभागणीचा खेळ काय रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महिला खुल्या गटातून माजी आमदार यांच्या सौभाग्यवती अ‍ॅड. स्वाती शिंदे आणि नगरसेविका पुष्पलता पाटील यांच्यात तर दुसर्‍या गटात शिवसेना नेते दिगंबर जाधव यांच्या पत्नी नगरसेविका सौ. पद्मिनी जाधव, नगरसेविका अश्‍विनी खंडागळे, अपक्ष सुमय्या गवंडी यांच्यात मतविभागणीतून अस्तित्वाचा फैसला होणार आहे. 

प्रभाग 17 व 18 मध्ये आघाडीतूनच भाजपमध्ये काही आजी-माजी नगरसेवक गेले आहेत. त्यामुळे आघाडी-भाजपबरोबरच त्या नगरसेवकांच्याही अस्तित्वाच्या लढाईचा फैसला मतदानातून स्पष्ट होणार आहे.

प्रभाग 19 मध्ये आघाडीच्या विद्यमान युवराज गायकवाड, प्रियांका बंडगर, कांचन भंडारे या नगरसेवक-नगरसेविकांसमोर भाजपने नव्याने विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, अप्सरा वायदंडे, सविता मदने यांचे आव्हान केले आहेे. प्रभाग 20 मध्ये तर माजी महापौर विवेक कांबळे व पारंपरिक प्रतिस्पर्धी योगेंद्र थोरात व संगीता हारगे व जयश्री कुरणे हे प्रतिस्पर्धी यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निकालातून होणार आहे.  

मतमोजणीतून आघाडी-भाजपसह सर्वच पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचाच फैसला होणार आहे. पण निकालापूर्वीच जनतेतून मताचे कल, पैजांचे फड रंगू लागले आहेत. यामुळे या चर्चेतून उमेदवार, समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

‘मिरज पॅटर्न’ला दणका!

महापालिकेच्या राजकारणात काहीही उलथापालथी झाल्या तरी प्रत्येक निवडणुकीत नेहमीच मिरजेच्या प्रस्थापित कारभार्‍यांचे ‘अंडरस्टँडिंग’ दिसून येत असे. पुढे हाच फॉर्म्युला महापालिकेच्या कारभारातही ‘मिरज पॅटर्न’ म्हणून वर्षानुवर्षे अखंडित राहिला होता. पण या निवडणुकीत मात्र त्याला मोठा छेद बसला आहे. गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार यांच्यासमोर माजी महापौर इद्रिस नायकवडी, तर इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर यांच्यासमोर अल्लाउद्दीन काझी उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निकालातून एकजण मनपात आणि एकजण बाहेर हे स्पष्ट आहे. हा एकप्रकारे मिरज पॅटर्नला दणका आहे.

समिकरणे बदलणार

आतापर्यंत महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाड्यांत सत्ताधारी-विरोधक म्हणून राजकारण चालत असे. यामध्ये भाजप पक्ष हा नावापुरताच होता. पण यावेळी केंद्र, राज्यासह सर्वच स्थानिक संस्थांमध्ये भाजप सत्तेवर आहे. त्याच पद्धतीने महापालिकेतही त्यांनी ताकदीने मैदानात उडी घेतली होती. आता निकालातून सत्ता कोणाची याचा फैसला होईलच. पण भाजप हा सत्ताधारी होऊ शकला नाही तरी विरोधक म्हणून ताकदीने यापुढे कार्यरत राहील. त्यामुळे साहजिकच महापालिकेतील राजकीय समिकरणे बदलणार, हे स्पष्ट आहे.