निसर्गाची किमया न्यारी, झुडुपातून अवतरली गजराजाची स्वारी

Last Updated: Mar 26 2020 2:53PM
Responsive image


लिंगनूर : प्रवीण जगताप

निसर्गावर अतिक्रमण केले की प्रकोपाला, नव्या संकटांना सामोरे जावे लागले असल्याचा आजवरचा इतिहास आहे. कोरोनाचा जन्म आणि सहजासहजी न रोखता येणारा फैलाव हेसुद्धा त्याचेच एक रूप असू शकते. निसर्ग मोठा चमत्कारी आहे. किमयागार आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्याच्यात आहे. त्यामुळे निसर्गाला जपले तर आनंदानुभूती मिळत राहील यात शंका नाही. संतोषवाडीत अशीच एक आनंदानुभूती आपल्या मोबाईलमध्ये टिपली आहे, निसर्गप्रेमी शिक्षक रघुनाथ हेगणावर यांनी....!

संतोषवाडी ( ता. मिरज, जि. सांगली ) येथे त्यांच्या घरानाजीक जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर कोपऱ्यावर रस्त्यालगत काल रात्री एक हत्तीसारखी आकृती दिसली. ती आकृती बनवली होती वेगवेगळ्या वेलींनी. बाभळीच्या झाडावर वाढत निघालेल्या वेलींनी आता हत्तीचा हुबेहूब आकार पूर्ण केलाय. रात्री त्यांनी त्याचे आपल्या मोबाईलवर छायाचित्रे घेतली. आश्चर्य म्हणजे दिवसासुद्धा अगदी पाठ, सोंड, गळा, पाय सगळे अवयव दिसतील असा आकार वेलींनी नैसर्गिकरित्या प्राप्त केला आहे. ते बाभळीचे झाड कोणी तोडले असते तर वेलींचा हा आकार तयार झालाच नसता. निसर्गावर प्रेम करा. निसर्गाला जवळ करा. निसर्ग खूप सुंदर आहे. त्याला त्रास होईल असे वागू नका. जणू असाच काहीसा संदेश या नैसर्गिक चमत्कृतीने दिला असेल असे समजायला हरकत नाही. शिवाय गजराजाची मूर्ती अनेकजण श्रद्धा किंवा अंधश्रध्दा म्हणा. पण शुभ संकेत मानतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत निसर्ग काही शुभ संकेत तर देत नसेल ना..!

संतोषवाडी (ता.मिरज.) येथील शाळेसमोरुन लिंगनूर कडे जाणाय्रा रस्त्याच्या गावातील कोपऱ्यावर वेलींच्या झुपक्याने उभी सोंड केलेल्या हत्तीचा आकार निसर्गतः तयार झाला आहे.  बऱ्याच ठिकाणी उद्यानात झुडूपांना वेगवेगळे दिलेले असतात मात्र हा हत्ती पाहिल्यावर निसर्ग महान किमयागार आहे याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. अशी प्रतिक्रिया निसर्गालाच ईश्वर मानणारे निसर्गप्रेमी रघुनाथ हेगणावर यांनी यावेळी बोलताना दिली.