होमपेज › Sangli › जिल्ह्यात 75 हजार मतदारांची नावे वगळली

जिल्ह्यात 75 हजार मतदारांची नावे वगळली

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी 

रंगीत  छायाचित्रे नाहीत, दिवंगत  आणि पत्त्यावर सापडत नाहीत अशा जिल्ह्यातील 75 हजार 115 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. ती पुन्हा नावे समाविष्ट करण्यासाठी ते अर्ज करू शकतात. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी  शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणार्‍यांची नावे मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यासाठी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम शनिवारपासून महिनाभर राबवण्यात येणार आहे.  यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मुनाज मुल्ला उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,   गेल्यावेळी मतदान केले होते, मात्र सध्या नाव सापडत नाही, अशा तक्रारी ऐकल्या जाणार नाहीत. जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील 75 हजार नावे वगळली आहेत. त्यात सर्वाधिक सांगली विधानसभा मतदार संघातील 39 हजार 235 जणांचा समावेश आहे. मिरज 9 हजार 870, इस्लामपूर 9 हजार 298, शिराळा 4 हजार 792, पलूस-कडेगाव 3 हजार 309, खानापूर 1 हजार 308, तासगाव-कवठेमहांकाळ 1 हजार 642 आणि जतमधील 5 हजार 561 नावे वगळली आहेत.

दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी जिल्ह्यातील मतदार संख्या 22 लाख 30 हजार 743 एवढी आहे. त्यात पुरुष 11 लाख 58 हजार 795 आणि स्त्री मतदार 10 लाख 71 हजार 885 एवढी आहे. तृतीयपंथी मतदार 57 आहेत. एकूण 2 हजार 405 मतदान केंद्र आहेत.

ते म्हणाले, प्रत्येक वर्षी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवला जातो त्यांची यंदाही अंमलबजावणी केली जात आहे. शनिवारी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 18 वर्षे पूर्ण होणारे मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतील.   अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द होईल. 

प्रत्येक राजकीय पक्षांनी यादीतील नावांची खात्री करावी. चुका दुरुस्त कराव्यात. ऐनवेळी कोणाचीही तक्रार घेणार नाही. नावे वगळलेले पुन्हा अर्ज करू शकतात. गणेशोत्सव काळात, तसेच महाविद्यालयात मतदार जागृती करण्यात येईल. या जागृती मोहिमेची केंद्रीय निरीक्षकांकडून पाहणी होणार करण्यात येणार आहे.