शिराळा (सांगली) : प्रतिनिधी
चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील सुरेश दिनकर चव्हाण याने भावजई जयश्री योगेश चव्हाण (वय २४) आणि पुतण्या अविनाश योगेश चव्हाण (वय २) यांचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी कामोठे (पनवेल) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश चव्हाण व योगेश चव्हाण (मूळ गाव चव्हाणवाडी, येळापूर, ता. शिराळा) हे दोघेजण कामोठे (पनवेल) येथे राहत होते. सुरेश चव्हाण हा मोठा असून लहान योगेश याचे तीन वर्षांपूर्वी आटुगडेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील जयश्री हिच्याबरोबर झाला होता. योगेश यास दोन वर्षाचा अविनाश हा लहान मुलगा आहे. सुरेश हा अविवाहित असून कोणताही कामधंदा न करता घरीच बसून असायचा. नोकरी व कामधंदा करत नसल्याने त्याचा विवाह ठरत नव्हता. त्यातच लहान भावाचे लग्न झाले माझे अजून नाही. असे तो सारखा सगळ्यांना बोलून दाखवायचा. यामुळे ही तो काहीसा खचला होता.
सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास योगेश नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. तर सुरेश हा घरीच होता. घरी असलेल्या सुरेशचा जयश्रीबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला. सुरेशने रागाच्या भरात दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास भावजईचा पुतण्याचा गळा दाबून खून केला.
रात्री ११ वाजता घरी आला, त्यावेळी आतून दरवाजा बंद असल्याने हाका मारत दरवाजा वाजवला २० मिनिटांनी भाऊ सुरेश याने दरवाजा उघडला असता पत्नी जयश्री आणि मुलगा अविनाश पडलेले दिसले. याबद्दल योगेश याने सुरेश यास विचारले असता त्याने स्वतः खून केल्याची कबूली दिली. रात्री उशिरा कामोठे पोलिसांनी संशयित सुरेश यास ताब्यात घेत अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.