Fri, Feb 28, 2020 17:37होमपेज › Sangli › सरकारने आधी भाजपच्या गुंडांना हद्दपार करावे; राजू शेट्टींचा घणाघात

सरकारने आधी भाजपच्या गुंडांना हद्दपार करावे; राजू शेट्टींचा घणाघात

Last Updated: Oct 09 2019 7:46PM

माजी खासदार राजू शेट्टीसांगली : प्रतिनिधी

सरकारने आधी भाजपच्या गुंडांना हद्दपार करावे. मग शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागावे. अन्यथा संघटनेच्या आंदोलनाचा हिसका सरकारला सोसणार नाही, असा इशारा संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

शेट्टी म्हणाले, सामाजिक, शेतकरी हितासाठी आंदोलन केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना पोलिसांनी दोन वर्षे चार जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस दिली आहे. हा प्रकार म्हणजे सरकारची दडपशाही आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. कडकनाथ घोटाळ्यात या दोघांनी केलेले आंदोलन एका मंत्र्याला फारच झोंबले आहे. यामुळे त्याची सरकारमधील पत गेली आहे. स्वाभिमानीचे  कार्यकर्ते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स  याला  घाबरत नसल्याने पोलिसी बळाचा वापर करून सरकार दडपशाही करु पाहत आहे. शेतकर्‍यांसाठी, जनतेसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय, आम्ही काय दहशतवादी, नक्षलवादी आहोत काय. यापुर्वीच्या सरकारच्या वेळी आम्ही अनेक उग्र आंदोलने केली, पण असा वाईट अनुभव कधीच आला नाही. 

ते पुढे म्हणाले, खून, बलात्कार, अपहरण, मटका, खंडणी गोळा करणारे अनेक गुंड उजळ माथ्याने आजही  समाजात वावरत आहेत. त्यात भाजपच्याही काही गुंडाचा समावेश आहे. सरकारने आधी यांना हद्दपार करावे. मिरज दंगलीतील कुणा-कुणावरील गुन्हे मागे घेतले आहेत, यावर आम्ही बोलायला सुरु केले, तर भाजप नेत्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे हा अन्याय आम्ही कदापी खपवून घेणार नाही. माझे कार्यकर्ते जिल्ह्यातून बाहेर जाणार नाहीतच. पण अटक केली तर त्याठिकाणी आमरण उपोषण  करतील. तसेच जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार करणार आहोत. यानंतरही नोटीसा मागे घेतल्या नाहीतर संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जो उद्रेक होईल, त्याला सरकार व पोलिस जबाबदार असेल. 

विशाल पाटील म्हणाले, हा सरळसरळ अन्याय आहे. शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्यांना दाबण्याचा हा प्रयत्न सरकार  प्रशासन व पोलिसांना पुढे करुन करीत आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सामाजिक चळवळ मोडून काढण्याचा हा पेशवाई सरकारचा डाव आहे. हिटलरशाही आम्ही कदापी खपवून घेणार नाही. जनता या दडपशाहीला मतदानातून उत्तर देईल. या वेळी उमेश देशमुख, महावीर पाटील, जयकुमार कोले, संदीप राजोबा, संजय खोलकुंबे, संजय बेले, पोपट मोरे, नितीन चव्हाण उपस्थित होते. 

मिरजेतील महारांजावर भाजपने दबाव टाकला

शेट्टी म्हणाले, मिरजेतून आम्ही शिवाचार्य महाराज यांना उमेदवार करण्याचे ठरविले होते. ते माझे वर्ग मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी याला होकार दिला होता. पण भाजपने त्यांच्यावर दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावली. मंत्री खाडे  हे आता पाला-पाचोळ्याची  व कचर्‍याची भाषा करीत आहेत. हे त्यांना शोभत नाही. पण जनता आता तुमचा कचरा केल्याशिवाय राहणार नाही.