Fri, Apr 23, 2021 14:53
सांगलीत भरचौकात आला बिबट्या, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Last Updated: Mar 31 2021 11:12AM

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात बुधवारी (दि.३१) सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास राजारामबापू बँकेच्या शाखेजवळ एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक वाचा :  १० दिवसांनंतर बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता

बुधवारी सकाळी राजवाडा चौकातील राजारामबापू बँकेलगत असलेल्या एका बोळातून बिबट्या धावताना दिसून आला. या बोळाजवळच असलेल्या चहाच्या टपरीपासून तो गेल्याचे चहावाल्यासह काही नागरिकांनी पाहिले. तेथून बिबट्या थेट रॉकेल लाईन परिसरात असलेल्या एका पडक्या घरात घुसला. याची माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनविभागाच्या लोकांनीही तेथे धाव घेतली.

अधिक वाचा : काँग्रेसने पवारांचे दुखणे केले बेदखल

सकाळपासूनच पोलिसांनी राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने त्या पडक्या घराजवळ जाळी बांधली. तर पडक्या घराच्या दुसर्‍या बाजूकडूनही वनविभागाने जाळी लावली आहे.

अधिक वाचा : भाजपचं पित्त का खवळतंय?; शिवसेनेचा सवाल

वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रवीण ढाणके, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी बाबुराव शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पडक्या घरात त्याचा शोध घेऊन त्याला बेशुद्ध करून पकडण्यात येणार असल्याचे ढाणके यांनी सांगितले. शिवाय त्याच्या पायाच्या ठस्यावरून तो तीन वर्षांचा असावा, असा अंदाजही ढाणके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे  प्रयत्न सुरू आहेत.

कुत्र्याची केली शिकार

दरम्यान, राजारामबापू बँकेलगत असलेल्या एका टेरेसवर बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आले. वनविभागाने पंचनामा करून कुत्र्याचे शव ताब्यात घेतले आहे. बिबट्याने पूर्ण रस्ता ओलांडून सुमारे आठ ते दहा फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी मारून पडक्या घरात प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा बिबट्या सांगलीत कोठून आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.