होमपेज › Sangli › दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरच कोथळे प्रकरणाची माहिती घेणार

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरच कोथळे प्रकरणाची माहिती घेणार

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:59PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मारहाण करून खून केल्या प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमातूनच मिळाली आहे. याप्रकरणी शासनाने माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्याची माहिती घेणार असल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मिरजेतील एका कार्यक्रमासह सांगली न्यायालयातील हिवरे तिहेरी खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते शनिवारी सांगलीत आले होते. सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोथळे खून प्रकरणी माझी नियुक्ती केल्याचे पत्र शासनाच्या विधी विभागाकडून प्राप्त झाले आहे. मात्र या प्रकरणाची कसलीही माहिती सीआयडीकडून अद्याप घेतलेली नाही. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांद्वारेच या घटनेची माहिती सध्या समजली आहे. 

या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतरच त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोथळे कुटुंबियांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.