Mon, Aug 10, 2020 04:13होमपेज › Sangli › विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत जयंत पाटील

विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत जयंत पाटील

Last Updated: Oct 28 2019 1:11AM
मुंबई ः विशेष प्रतिनिधी

राज्यात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला जसा वेग आला आहे, तसा विरोधी गोटातील हालचालींनाही वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा वाढल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. माजी मंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची नावे आघाडीवर आहेत.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 42, तर काँग्रेसला 41 विधानसभेच्या जागा मिळाल्या होत्या. तरीही विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्याच नेत्यांची वर्णी लागली होती. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने विजयात मोठी मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला यावेळी 54 जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला 44 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. जवळपास 10 जागांनी हा आकडा मोठा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नावे चर्चेत आली आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाच ठरावाद्वारे देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पवारांवर राष्ट्रवादीच्या भवितव्याची मोठी जबाबदारी असल्याने आता ते प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहेत. म्हणूनच विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही घाईने अथवा दबावाने अजित पवार यांचे नाव पुढे आणतील, अशी शक्यता नाही. गेल्या पाच वर्षांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा चांगल्या पद्धतीने निभावत धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रतिष्ठेची लढाईही जिंकली आहे. हा विजयही मोठ्या फरकाने असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू झाली आहे. पवारांचे विश्वासू शिलेदार आणि माजी मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष वळसे-पाटील हे प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले आहेत. त्यांना विधिमंडळ कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने जोर धरला आहे. तर, ज्येष्ठता आणि आक्रमकपणा या जोरावर भुजबळांचे नाव चर्चेत आले आहे. ‘ईडी’च्या कचाट्यात सापडलेल्या भुजबळांभोवतीचा फास अजूनही  निघालेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. चर्चेतील अजून  एक नाव म्हणजे जयंत पाटील यांचे आहे. जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती हाताळली असून, अजित पवारांच्या गैरहजेरीत त्यांना विधानसभेत सत्ताधारी पक्षाची बर्‍यापैकी कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय सांगली जिल्हा हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच यापैकी 30 तारखेला कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आघाडी विरोधातच बसणार ः प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी ही विरोधातच बसणार आहे. भाजप-शिवसेना युतीला लोकांनी कौल दिला आहे, आम्हाला कौल दिलेला नाही. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की, आम्ही विरोधी पक्षातच बसणार. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आणि शिवसेना यांना जनमताचा कौल मिळाला आहे. सत्तास्थापनेत राष्ट्रवादी कोणतीही भूमिका बजावणार नाही, असे त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.