होमपेज › Sangli › आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 11:23PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

आ. जयंत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील (वय 95) यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रीमती पाटील यांचा जन्म 1922  साली सातारा जिल्ह्यातील चरेगाव (ता. कराड) येथील कृष्णराव माने यांच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. कुसुमताईंचा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी दि. 26 मे 1946 रोजी विवाह झाला. त्यांनी बापूंना राजकीय व सामाजिक वाटचालीत मोलाची साथ दिली. बापूंच्या अकाली निधनानंतर त्यांनी कुटुंब सावरण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, प्रेमळ होता. त्या ‘आईसाहेब’ या नावाने परिचित होत्या. त्या मुंबई अथवा राजारामनगर येथे वास्तव्यास असताना आपल्या घरी आलेल्या माणसांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत असत. नुकतेच कुसुमताईंच्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन कासेगाव येथील ‘पदयात्री’ या राजारामबापूंच्या स्मारकामध्ये त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला होता.    

            
त्यांच्या पश्‍चात उद्योजक भगतसिंह पाटील, जयंत पाटील हे दोन मुलगे, तसेच राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई प्रसाद तनपुरे, सौ. विजया फत्तेसिंग जगताप (शिवाजीनगर, पुणे), सौ. नीलिमा नरेंद्र घुले-पाटील (अहमदनगर) या  तीन मुली तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

शनिवारी सकाळी आठ वाजता कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. येथील आझाद विद्यालयाच्या प्रांगणात 9.30 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर घरी धार्मिक विधी करून 10.30 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांच्या पार्थिवावर येथील कृष्णा नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

वाळवा तालुक्यातील विविध संस्था, शाळा, कॉलेज तसेच गावा-गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना  श्रद्धांजली वाहण्यात आली.