इस्लामपूर : 'त्या' चौघांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Mar 26 2020 1:21PM
Responsive image


इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा 

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे केंद्र बनलेल्या इस्लामपूरमधील त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या १३ पैकी बुधवारी ५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ८ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संसर्ग झालेल्यांची प्रकृतीही स्थिर आहे. हे शहराच्या आणि प्रशासनाच्यादृष्टीने दिलासादायक वृत्त आहे. होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या २७ जणांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले

सौदी अरेबियाहून हज यात्रा करुन आलेल्या येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. या कुटुंबाशी संबंधित आणखी १३ जणांना आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कातील २७ जणांना होम क्वारंटईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आयसोलेशनमधील ‍१३ पैकी आणखी ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. उर्वरित ८ जणांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. हे वृत्त दिलासादायक आहे.

दरम्यान कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या परीसरातील ८५० घरातील चार हजार जणांची तपासणी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची १० पथके शहरात कार्यरत आहेत. होम क्वारंटाईनमधील २७ जण आरोग्य  विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यामध्ये सध्या तरी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:हून आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.