Sat, Oct 31, 2020 10:40होमपेज › Sangli › ‘कोरोना’ अंगावर काढणे ‘जीवघेणे’

‘कोरोना’ अंगावर काढणे ‘जीवघेणे’

Last Updated: Sep 13 2020 1:00AM
सांगली : उद्धव पाटील

कोरोना ‘हॉटस्पॉट’ झालेला सांगली जिल्हा दिवसेंदिवस अधिक ‘हॉट’ बनत चालला आहे. रुग्णसंख्येचा डबलिंग रेट सतरा दिवसांवर आला आहे. पंधरा दिवसांत मृत्यू दुप्पट झाले आहेत. त्यातून गांभीर्य स्पष्ट होते. मधुमेह, रक्तदाब, श्वसन आदी अन्य आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना अंगावर काढणे जीवघेणे ठरत आहे. उपचाराच्या सुविधा वाढत आहेत, तरीही त्यांची मर्यादा उघडी पडलेली आहे. त्यामुळे कोरोना अंगावर न काढता वेळीच तपासणी करून उपचाराखाली येणे महत्त्वाचे आहे. 

सांगली जिल्ह्यात ‘कोरोना’चा पहिला रुग्ण दि. 23 मार्च 2020 रोजी आढळला. सौदी अरेबिया येथून इस्लामपूर येथे आलेल्या 4 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल या दिवशी पॉझिटिव्ह  आले. जिल्ह्यात पहिला मृत्यू दि. 19 एप्रिल रोजी झाला. मार्चमध्ये 25 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. एप्रिल महिन्यात केवळ 6 आणि मे महिन्यात 81 आणि जून महिन्यात 272 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. जून महिनाअखेर एकूण 12 व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

मात्र जुलै महिन्यापासून ‘कोरोना स्प्रेड’ वाढला. जुलै महिन्यात 2 हजार 259 पॉझिटिव्ह तर, 66 व्यक्तींचा मृत्यू,  ऑगस्ट महिन्यात 9 हजार 751 पॉझिटिव्ह आणि 417 मृत्यू, सप्टेंबरच्या अकरा दिवसात तर 8 हजार 976 पॉझिटिव्ह आणि 303 व्यक्तींचा मृत्यू झाला. 

जिल्ह्यात 21 ते 50 वर्षे वयोगटात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या जास्त आहे. ‘कोरोना’पासून तरूण सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. मृत्युची संख्या 51 ते 80 वयोगटामध्ये अधिक आहे. पुरूष आणि महिलांची तुलना करता कोरोना पॉझिटिव्हमध्ये पुरूषांचे प्रमाण 61 टक्के, महिला 39 टक्के, तर मृत्युची संख्या पाहता पुरूषांचे प्रमाण 69 टक्के, स्त्रियांचे प्रमाण 31 टक्के आहे. 

छुपे ‘वाहक’; धोका अधिक

हायरिस्क व्यक्ती तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यंत्रेणेने तपासणीसाठी घरी येण्याची वाट पाहणे धोक्याचे ठरू शकते. लक्षणे दिसत असतानाही तपासणी न करणे स्वत:साठी आणि इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते. लक्षणे असूनही कोरोनाची चाचणी न केलेले छुपे वाहक मोठ्या संख्येने आहेत. ते अधिक धोकादायक आहेत. कोरोनाची लक्षणे असतील आणि मधुमेह, रक्तदाब, श्वसन विकार व अन्य आजार असतील तर कोरोना जीवघेणा ठरू शकतो. वेळीच तपासणी आणि उपचार अतिशय महत्वाचे आहे.  

ऑक्सिजन हेच औषध..!

रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत आहे. त्यागतीने उपचाराच्या सुविधा वाढताना दिसत नाहीत. त्यामुळे  आजार बळावण्यापूर्वीच उपचाराखाली येणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी खेड्या-पाड्यातून सांगली-मिरजेला रुग्ण येईपर्यंत बराच कालावधी लागत होता. त्या कालावधीत ऑक्सिजन खालावल्यास रुग्णाला धोका वाढून परिस्थिती क्रिटिकल बनत होती; पण आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केल्याने ते अतिशय लाभदायी ठरेल.

 "