Sat, Sep 19, 2020 09:19होमपेज › Sangli › चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ

चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Last Updated: Aug 04 2020 12:57PM

चांदोली धरणवारणावती : पुढारी वृत्तसेवा 

चांदोली धरण परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत ७० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. त्यामुळे चांदोली धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी १ मीटरने वाढली आहे. 

चांदोली परिसरात रविवारीरात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाला जोर नव्हता पण संततधार मात्र कायम होती.  पण सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सोमवारी सकाळी आठ ते आज मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. वीज निर्मिती बंद असल्यामुळे विसर्ग ही पूर्णतः बंद आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणी पातळीत १ मीटरने वाढ झाली आहे.

चांदोली परिसरात गेल्या पंधरा ते तीन आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. धरणातील पाणीसाठा ही गतवर्षीच्या तुलनेत सहा टीएमसीने कमी होता. धरणातील कमी पाणीसाठा, पावसाने दिलेली उघडीप यामुळे चिंतेचे वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे चांदोलीत समाधानकारक वातावरण आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या आठ दिवसांत धरण १०० टक्के भरेल अशी चिन्हे आहेत.

चांदोली येथील वीज निर्मिती पूर्णतः बंद असल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग ही बंद आहे. त्यामुळे काही ठिकाणी वारणा नदी कोरडी पडली होती. दोन दिवसांतील पावसामुळे आता ती पुन्हा प्रवाहित झाली आहे. 

चांदोली धरणाची पाणी पातळी सध्या ६१५.१० मीटर इतकी आहे. धरणात २३.९२  टीएमसी पाणीसाठा असून धरण ६९.५४ टक्के भरले आहे. आज  अखेर धरण क्षेत्रात १०४९ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.

 "