Tue, Aug 04, 2020 23:31होमपेज › Sangli › तासगाव : सावळज-बिरणवाडी पूल खचला, वाहतूक बंद

सावळज-बिरणवाडी पूल खचला, वाहतूक बंद

Last Updated: Oct 10 2019 11:09AM

अग्रणी पात्रातील सावळज -बिरणवाडी रस्त्यावरील पूल खचलातासगाव : प्रतिनिधी

मुसळधार पावसाने तासगाव पूर्वच्या दुष्काळी टापूतील अग्रणी नदीला पूर आला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, पाणी ओसरु लागताच अग्रणी पात्रातील सावळज -बिरणवाडी रस्ता उखडून पूल खचला असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत पूलावरील दुचाकी तसेच चारचाकी वाहतूक बंद करण्याचे आदेश तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिले आहेत. 

बुधवारी रात्रभर या पूलावरून पाणी वाहत आहे. गुरूवारी सकाळी थोडासा पूर ओसरु लागताच सावळज बाजूकडील रस्ता उखडला असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

दरम्यान, तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. सिध्देवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच अग्रणी नदीचे पात्र दुथडी भरून पुन्हा वाहू लागले आहे. त्यामुळे नदीला पुन्हा पूर आल्याचे चित्र आहे. तासगाव तालुक्यातील सावळज वज्रचौंडे, गव्हाण व कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी तुडूंब भरुन वाहू लागली आहे. काही ठिकाणी पाणी नदीच्या पात्राबाहेर गेले आहे.

गेल्या दोन दिवसांत तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील वायफळे, बिरणवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी गावांना पावसाने झोडपून काढले आहे. 

सिध्देवाडी तलाव पूर्ण भरल्याने बुधवारी दुपारी पाणी बाहेर पडून अग्रणी नदीच्या पात्रात दाखल झाले. बुधवारी रात्री अग्रणी पात्रातील वायफळे-यमगरवाडी, सावळज-बिरणवाडी, गव्हाण-मणेराजुरी आणि मळणगाव-योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. तसेच अग्रणी पात्रातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले आहेत.