Mon, Jul 06, 2020 10:01होमपेज › Sangli › पॉलिश करण्याच्या बहाण्याने मिरजेत पाच तोळे सोने लंपास

पॉलिश करण्याच्या बहाण्याने मिरजेत पाच तोळे सोने लंपास

Last Updated: Dec 04 2019 1:08AM
मिरज : प्रतिनिधी
सोने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून दोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोने दोघा भामट्यांनी हातोहात लंपास केले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी इंडियन ऑईलमधील निवृत्त कर्मचारी गजानन माळी (रा. वेताळबानगर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

वेताळबानगर परिसरात एका वॉशिंग पावडरचे मार्केटिंग करण्यासाठी दोन तरुण आले होते. प्रत्येक घरात जाऊन ते वॉशिंग पावडरबाबत माहिती देत होते.दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते दोघे जण गजानन माळी यांच्या घरात गेले. वॉशिंग पावडरबाबत माहिती सांगण्यास सुरुवात केली. यावेळी माळी यांनी त्या दोघांना ‘आम्हाला काही नको,’ असे सांगितले. त्यांना पिटाळून माळी घरातून बाहेर गेले. माळी घरातून बाहेर गेल्याचे पाहताच त्या दोघांनीं पुन्हा माळी यांचे घर गाठले. घरात त्यांच्या पत्नी आणि दोन सुना असे तिघे जण होते. 

या तिघांना त्या दोघांनी पुन्हा  वॉशिंग पावडर कशी चांगली आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा अनुभव घेण्यासाठी घरातील एका भांड्यावर त्याचा प्रयोग करून दाखविण्यात आला.भामटे सांगतील तसेच त्या तिघी जण ऐकत असल्याने त्या दोघांनी “आम्ही या पावडरने सोनेदेखील पॉलिश करू शकतो” असे सांगितले. “घरातील सोने आणा” असेही सांगितले. त्यानुसार माळी यांच्या सुनांनी दोन गंठण, दोन अंगठ्या आणि दोन कर्णफुले असे एकूण दोन लाख रुपये किंमतीचे पाच तोळे सोने त्यांच्याकडे आणून दिले. 

त्या दोघांनी हळद पावडर आणायला  सांगितली. वॉशिंग पावडर आणि हळद पावडरसह सोने कुकरमध्ये घालून पाच मिनिटे गॅसवर उकळा असे  सांगून त्या दोघांनी तेथून पोबारा केला.पाच मिनिटांनंतर माळी यांच्या सुनांनी कुकर उघडून बघितला. त्यावेळी  त्यामध्ये सोने नसल्याचे त्यांना आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माळी यांनी शहर पोलिसात दोन भामट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.