Mon, Aug 03, 2020 15:05होमपेज › Sangli › बंदिस्त नाले, कुपवाड ड्रेनेज, मिरज दर्गा प्रस्ताव द्या

बंदिस्त नाले, कुपवाड ड्रेनेज, मिरज दर्गा प्रस्ताव द्या

Last Updated: Jan 15 2020 1:46AM
सांगली : प्रतिनिधी
शहरातील सांडपाणी आणि शेरीनाल्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी  बंदिस्त नाल्याचे रोलमॉडेल सादर करा. कुपवाड ड्रेनेज आणि मिरज दर्गा सुशोभीकरणाचेही प्रस्ताव सादर करा. सर्व प्रस्ताव मार्गी लावून शहराचा कायापालट करू, असे आदेश असे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. महापालिका क्षेत्रातील प्रश्‍नांसंदर्भात मुंबईत नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, महापालिका आयुक्‍त नितीन कापडनीस, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, युवा नेते अमर निंबाळकर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार आदी उपस्थित होते.

कापडनीस म्हणाले, शहरातील विविध प्रश्‍नांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली.  प्रामुख्याने शहरातील सांडपाणी आणि नाल्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. अनेकदा हे सांडपाणी शहरात शिरते. त्यासाठी नाले बंदिस्त करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडे 14 व्या वित्त आयोगातून 38 कोटी रुपये  शिल्लक आहेत. त्यातून नाले बंदिस्त करण्याची चर्चा झाली. 

शहरातील एक नाला बंदिस्त करण्याचे रोलमॉडेल तयार करा. ते अंमलात आणून यशस्वी झाले तर सर्वच नाले बंदिस्त करू, असे मंत्री पाटील म्हणाले. शेरीनाल्याचे सांडपाणी थेट नदीत मिसळू नये यासाठी ट्रक पार्किंगजवळच नवीन मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची सूचना करण्यात आली. कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव तत्काळ प्रस्ताव सादर करा असे आदेश मंत्री पाटील यांनी  दिले. मिरजेत मीरासाहेब दर्गा परिसर सुशोभीकरणाचा प्रस्ताव महापालिकेतील तत्कालिन महाआघाडीच्या सत्तेत तयार झाला होता. तो प्रलंबित आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. 

कापडनीस म्हणाले, महासभेने एलईडी योजना राबविण्याचा ठराव केला  आहे. मात्र मनपा पदाधिकारी, नगरसेवकांनी एलईडी योजना राबविण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधांचा खर्च अधिक असल्याची भूमिका मांडली. यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनीही खुलासा केला. याबाबत पुन्हा बुधवारी स्वतंत्र बैठक होणार आहे. त्यावेळी योजनेच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होईल.

बैठकीबाबत ‘संगीत मानापमान’ सुरूच
महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानुसार महापालिकेतील प्रश्‍नांबाबत जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी मनपातील विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी नव्हते. याबद्दल नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनीही बैठकीत विचारणा केली. त्यानुसार बुधवारी होणार्‍या बैठकीला महापौरांना निमंत्रित करण्याचा निर्णयही झाला. मात्र, त्याचा उल्लेख आयुक्‍तांच्या आदेशातच करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना डावलण्यावरून ‘संगीत मानापमान’ रंगले आहे.