Wed, Jan 22, 2020 23:29होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुका सुरू

कडेगाव तालुक्यात भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुका सुरू

Published On: Sep 12 2019 4:06PM | Last Updated: Sep 12 2019 4:06PM
कडेगाव : शहर प्रतिनिधी

गुलालाची उधळण,फटक्याची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात गणपती बाप्पा मोरया,‘पुढच्या वर्षी लवकर’ या असे म्हणत कडेगाव शहरासह तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.

आज (गुरुवारी) अनंतचतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या गणरायाला शहरासह तालुक्यातील सुमारे 200 सार्वजनिक गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात सुरू असून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

गेले 12 दिवस तालुक्यात भक्तिमय वातावरणात गणेशाची आराधना सर्वत्र करण्यात आली. तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळानी अत्यंत आकर्षक देखावे करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर काही गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत केली. 

गुरुवारी सकाळी विधिवत पूजा आरती वगैरे करण्यात आली. दुपारी 3 वाजल्यापासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. पारंपरिक ढोल, ताशा, मृदुंग अशा या वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देताना भक्तगण भावूक होत  आहेत. सर्वच गणेश मंडळानी डॉल्बीला फाटा दिला आहे.

सध्या कडेगाव तलाव पाण्याने तुडुंब भरला असून या तलावात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.