Tue, Jun 15, 2021 13:22होमपेज › Sangli › सदाभाऊ खोतांची जीभ घसरली; शेट्टींवर खालच्या पातळीवर जाऊन टिका

सदाभाऊ खोतांची जीभ घसरली; शेट्टींवर खालच्या पातळीवर जाऊन टिका

Last Updated: Aug 01 2020 3:46PM
इस्लामपूर (सांगली) : पुढारी ऑनलाईन

'राजू शेट्टी नव्हे तर हा काजू शेट्टी' अशी खालच्या पातळीवर जाऊन आज ( दि. १ ) सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर टीका केली. दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. पण, टीका करताना त्यांची जीभ घसरली. या टिकेला राजू शेट्टींनी त्वरित प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आजचा दिवस दोन शेतकरी नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने गाजला.

रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेवेळी राजू शेट्टी हे भंपक व्यक्ती असल्याचा शब्दप्रयोग केला. त्याला राजू शेट्टी यांनी त्वरित प्रत्युत्तर देत, सदाभाऊ खोत यांचे आंदोलन माझ्या विरोधात आहे की सरकार विरोधात असा सवाल केला. खोत यांचे आंदोलन फेल गेल्याने त्यांचे ताळतंत्र बिघडले आहे. तसेच खोत यांनी आपली पातळी सोडली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

दूध दरवाढीवरुन भाजपने राज्यभरात पुकारलेलं आंदोलन म्हणजे पुतनामावशीचं प्रेम आहे. भाजपला दूध दरवाढीवरुन आंदोलन करण्याचा अधिकार नाही. भाजपाच्याच काळात शेतकरी अडचणीत आला. फक्त राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी दुधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले तर काही ठिकाणी गाईला दुधाने आंघोळ घालण्यात आली. तर काही ठिकाणी रास्ता रोको केला, याचबरोबर सरकारचे निषेध म्हणून दगडाला अभिषेक घातला.