सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान काल (गुरूवार) झालेल्या जोरदार पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातील अग्रणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे या भागातील ओढे-नाले आणि अग्रणी नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: कवठेमंकाळ तालुक्यातील हिंगणगाव, मोरगाव, मळणगाव या ठिकाणी अग्रणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हे पूल वाहतुकीस बंद झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेजण वाहून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन केले आहे. तसेच पाणी आलेल्या मार्गावर प्रशासनाकडून रस्ता वाहतुकीस बंद असल्याचे फलक लावले आहेत.