Mon, Aug 10, 2020 03:58होमपेज › Sangli › वाळवा तालुक्यात रंगणार तुल्यबळ लढत

वाळवा तालुक्यात रंगणार तुल्यबळ लढत

Published On: Mar 12 2019 1:50AM | Last Updated: Mar 12 2019 1:50AM
इस्लामपूर : अशोक शिंदे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून गतवेळेपेक्षा प्रचाराच्या रणधुमाळीचे नेमके उलट चित्र यावेळी दिसणार आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने अशी लढत अपेक्षित आहे. याआधी भाजपच्या सहाय्याने लोकसभा मतदारसंघात मशागत केलेले कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मात्र तुर्तास उमेदवारीपेक्षा सत्ताधार्‍यांच्या प्रचारात सहभाग घ्यावा लागेल असे दिसते. सन 2014 मध्ये शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांचा विरोध असतानादेखील 23 हजारांचे मताधिक्क्य घेतले होते. यावेळी काँगे्रस - राष्ट्रवादी-स्वाभिमानी या महाआघाडीकडून  खा. शेट्टी तर विरोधात भाजप शिवसेनेकडून  धैर्यशील माने अशी लढत अपेक्षित आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी देखील  निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.  जयंत पाटील हे 1990 पासून सलग 6 निवडणुका जिंकून येथून प्रतिनिधीत्व करत आहेत. या तालुक्यातील व शिराळा मतदारसंघात येणार्‍या 49 गावांमध्येदेखील जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे.  त्याचबरोबर नानासाहेब महाडिक, आ.  शिवाजीराव नाईक, माजी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, डॉ. प्रताप पाटील, सी. बी. पाटील, अभिजित पाटील यांचे समर्थक बहुसंख्येने आहेत. या लोकसभा निवडणुकीला काँगे्रस-राष्ट्रवादी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे आ. जयंत पाटील यांची साथ खा. राजू शेट्टी यांना मिळणार असल्याचे दिसते. 

युतीच्या जागावाटपात लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेला आला आहे. माजी खा. निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने हे नव्या दमाने निवडणूक रिंगणात येत आहेत.  निवेदिता माने यांनी या परिसरात संपर्क वाढविला आहे. मंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांनी  वाळवा तालुक्याबरोबरच हातकणंगले - इचलकरंजी परिसरात याआधीच संपर्क वाढविला होता.  मात्र लोकसभेसाठी तयारी केलेल्या खोत यांची मात्र आता चांगलीच अडचण झाली आहे. नानासाहेब महाडिक यांचा गटदेखील लोकसभेला कोणती भूमिका घेणार, याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. तुर्तास तरी महाडिक गट हा कोणाच्या बाजूला अन् कोणाच्या विरोधात यापेक्षा हा गट जयंत पाटील यांच्याविरोधात राहणार असे दिसते. 

वाळवा परिसरातून आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवणार्‍या हुतात्मा उद्योग समुहातील वैभव नायकवडी, गौरव नायकवडी हे पाच वर्षांपासून सत्ताधार्‍यांशी संलग्न आहेत. हा गट भाजपच्या भूमिकेबरोबर राहिला असे दिसते. तालुक्यातील काँग्रेसला आघाडीच्या धोरणानुसार तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह काँग्रेसप्रेमींची साथ खा. शेट्टी यांना मिळू शकते. इस्लामपुरात नगरपालिकेवर अनेकवर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र गत निवडणुकीत सत्तापालट होवून नगराध्यक्ष झालेले निशिकांत भोसले - पाटील यांना देखील भाजप पक्षाच्या आदेशानुसार  शेट्टी यांच्या विरोधातच रहावे लागेल असे दिसते. शिवसेनेचा उमेदवारच असल्यामुळे आपसूकच शिवसेनेचे आनंदराव पवार, अभिजित पाटील ही स्थानिक नेतेमंडळी सत्ताधार्‍यांबरोबर एकवटणार आहेत. शेतकर्‍यांच्या भूमिकेकडे लक्ष आता काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजेच साखर कारखानदार व जोडीला शेतकर्‍यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे राजू शेट्टी हे एका बाजूला दिसत असले तरी प्रत्यक्षात एफआरपीचा प्रश्‍न, शेतकर्‍यांना तुकड्या-तुकड्याने एफआरपी दिल्याने त्यांना बसलेली झळ याचेही परिणाम या निवडणुकीत दिसले तर आश्‍चर्य वाटायला नको. त्याचबरोबर याआधी शेट्टी यांच्याविरोधात व त्यांच्या आंदोलनाला खीळ घालण्यात आघाडीवर असणारे कारखानदार शेट्टी यांची बाजू कशी घेणार, अन् ते शेतकर्‍यांना कितपत रुचणार; हादेखील प्रश्‍न आहे.