Wed, Aug 12, 2020 08:58होमपेज › Sangli › आम्ही पळून जात नाही; पळवून लावतो

आम्ही पळून जात नाही; पळवून लावतो

Published On: Mar 17 2019 1:50AM | Last Updated: Mar 17 2019 1:50AM
सांगली : प्रतिनिधी

ब्रिटीश सत्तेविरुद्ध झुंज देऊन त्यांना पळवून लावणार्‍या (स्व.) वसंतरावदादा पाटील यांच्या घराण्यातील आम्ही आहोत. आम्ही मैदानातून पळ काढत नाही, तर पळवून लावतो,  असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी केले.

ते म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याबाबत निर्णय घेतला जाईल. आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. 

पाटील म्हणाले,  आमचे घराणे झुंजणारे आहे. पळ काढणारे नाही.  आम्ही लढायला कधीच घाबरलो नाही आणि घाबरणार नाही. काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच आघाडीवर राहू.
सांगलीची जागा लढण्यास काँग्रेसमधील कोणीच तयार नसल्याने  ती स्वाभिमानी पक्षाला देण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे संतप्त बनलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला टाळे ठोकले. तसेच पाटील व कदम गटातील गटबाजी उफाळून आली. आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी ‘दादा घराण्याने मैदानातून पळ काढला’ असे वक्तव्य केले होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर  विशाल पाटील म्हणाले, सांगली आणि  नंदुरबार हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. केवळ 2014 मध्ये पराभव झाला म्हणून सांगली मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेणे चुकीचे आहे. 13 पैकी 12 वेळा दादा घराण्याने सांगलीची जागा प्रचंड मताने जिंकली आहे.   पण काहीजणांनी आम्ही मैदानातून पळून जात असल्याची टीका केली आहे. ती चुकीची आहे. 

ते म्हणाले,  ज्या-ज्या वेळी पक्षावर संकट आले, त्या-त्यावेळी दादा घराण्याने मोठ्या धिरोदात्तपणे त्याचा मुकाबला केला आहे. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवून पक्षाला नवसंजीवनी दिली होती. माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांनीही राष्ट्रवादी बाजूला झाली त्यावेळी मोठ्या हिंमतीने सामना करीत विरोधकांचा धुव्वा उडविला होता. पक्षाला पुन्हा उभारी दिली होती. आताही तशीच स्थिती आहे. पक्षाच्या आणीबाणीच्या वेळी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण काहीजण केवळ आपल्या पायापुरते पाहत आहेत. 

पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या  महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. असे असतानाही ही जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी काहीजण  प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दादा घराणे पक्षासाठी काहीही  करण्यास तयार आहे. आम्ही मैदातून पळून जाणारे नाही. पळणे हा आमच्या रक्तात नाही. लढून जिंकून दाखविणे हा दादा घराण्याचा पिंड आहे, असे विशाला पाटील यांनी सांगितले.