Thu, Aug 13, 2020 16:51होमपेज › Sangli › दहा लाखांचा गंडा: संशयिताचा भाऊ, भूमीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला अटक

दहा लाखांचा गंडा: संशयिताचा भाऊ, भूमीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला अटक

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:55PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील भूमी प्रॉपकॉर्न कंपनीत ठेवलेली दहा लाखांची ठेव परत न दिल्याप्रकरणी मुख्य संशयिताचा भाऊ तसेच कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इनामधामणीत ही कारवाई केली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विनोद सुखदेव कदम असे अटक केलेल्याचे नाव आहे. यातील मुख्य संशयित मनोज कदम मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. याबाबत इनामधामणीतील सुशीला पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोजकडे सुशीला पाटील यांनी त्यांच्या व सुनेच्या नावावर ठेव ठेवण्यासाठी दहा लाख रुपये 2014 मध्ये दिले होते. त्यानंतर सलग सोळा महिने त्या ठेवीवरील व्याजही पाटील यांना मिळाले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी ठेव परत देण्याविषयी तगादा लावला होता. मात्र आजतागायत त्याने ठेवीची रक्कम परत दिली नाही.  गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी विश्रामबाग पोलिसांनी कदम याच्या घरावर छापा टाकला होता. मात्र तो सापडला नाही.

दरम्यान, फिर्यादींनी शुक्रवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन कदमवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बोराटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला कारवाईचे आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री पथकाने धामणीतील कदम याच्या घरावर छापा टाकून मुख्य संशयित मनोजचा भाऊ व कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर विनोदला ताब्यात घेतले.  त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला रात्रीच अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, भूमी संस्थेतील ठेवींप्रकरणी फसवणूक झाल्याचे वृत्त समजताच गुरुवारी ठेवीदारांनी संस्थेच्या कार्यालयात ठेवी परत मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मात्र जबाबदार अधिकारी नसल्याने त्यांना ठोस उत्तरे मिळाली नाहीत.