Thu, Jul 02, 2020 18:15होमपेज › Sangli › मार्केट यार्डात तणाव; तोलाईचा प्रश्न भडकला

मार्केट यार्डात तणाव; तोलाईचा प्रश्न भडकला

Last Updated: Jan 31 2020 11:22PM
सांगली :  पुढारी वृत्तसेवा
धान्य विभागाकडील तोलाईचा प्रश्न चांगलाच भडकला आहे. ‘सेस चोरी’ आरोपांची धग वाढली आहे. त्यातून शुक्रवारी व्यापारी व हमाल ‘आमने-सामने’ आले. घोषणाबाजी, निदर्शने आणि निषेध फेर्‍यांनी मार्केट यार्डात तणाव निर्माण झाला. ‘हमाल प्रतिनिधी बाळासाहेब बंडगर यांनी माफी मागावी यासाठी व्यापार्‍यांनी बेमुदत व्यापार बंद पुकारला, तर हमालांनीही काम बंदचा पवित्रा घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान शुक्रवारी रात्री बेमुदत व्यापार बंद व काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. 

धान्य विभागाकडील तोलाईसंदर्भात गुरूवारी सायंकाळी सांगली बाजार समितीत बैठक बोलावली होती. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी मुजीर जांभळीकर, हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम, बाजार समितीचे हमाल प्रतिनिधी बाळासाहेब बंडगर उपस्थित होते. नेट वेट नमूद असलेल्या पॅकिंग मालावरील तोलाईस उच्च न्यायालयाने चार आठवडे स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे दि. 3 ऑक्टोबर ते स्थगिती आदेशापर्यंतची तोलाई मिळावी अशी मागणी मगदूम व बंडगर यांनी केली. दरम्यान पॅकिंग मालावरील तोलाईची मागणीच चुकीची असून आम्ही चोर्‍या करून तोलाईची रक्कम द्यायची काय, असा सवाल व्यापारी प्रतिनिधींनी केला. “कोण चोर्‍या करतोय. कोण सेस बुडवतो हे सर्वांना माहिती आहे”, असे हमाल प्रतिनिधींनी सुनावले. सेस चोरीवरून बैठक फिस्कटली. 

शुक्रवारी सकाळी मार्केट यार्डात चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालयाजवळ व्यापार्‍यांची गर्दी होऊ लागली. चोर म्हटले असल्यावरून व्यापार्‍यांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान हमाल व तोलाईदारही बाजार समितीसमोर एकत्र आले. घोषणाबाजी करत मार्केट यार्डातून दोन फेर्‍या काढल्या. चेंबर कार्यालयाजवळ जाऊन ‘शंखध्वनी’ केला. बाजार समितीसमोर घोषणाबाजी केली.

व्यापार्‍यांनीही ‘चेंबर’समोर एकत्र येऊन जोरदार निदर्शने, घोषणाबाजी केली. ‘चेंबर’च्या सभागृहात सभा घेतली. बाळासाहेब बंडगर जोपर्यंत व्यापार्‍यांची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद शहा, दीपक चौगुले, रमणिक दावडा, प्रशांत पाटील, अण्णासाहेब चौधरी, सुशील हडदरे तसेच व्यापारी उपस्थित होते. 

बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी रात्री व्यापारी व हमाल तोलाईदार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. सभापतींची शिष्टाई यशस्वी झाली. बेमुदत बंद मागे घेतला. तोलाईसंदर्भात न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यानंतर निर्णय होईल.

‘धान्य’कडील 115 दुकानांची तपासणी करा : बंडगर
हमाल प्रतिनिधी बाळासाहेब बंडगर म्हणाले, व्यापारी प्रतिनिधी मुजीर जांभळीकर यांच्या तीन दुकानांचा वार्षिक सेस सुमारे 25 लाख रुपये जमा व्हायला पाहिजे. पण केवळ 1 लाखच जमा होतो. जांभळीकर यांच्या तीन दुकानांसह धान्य व भुसार विभागाकडील 115 व्यापार्‍यांच्या दुकानांची तपासणी करावी अशी मागणी डीडीआर यांच्याकडे करणार आहे. माफी, दिलगिरीचा प्रश्नच येत नाही. वटाव, सूट, तूट यातून शेतकर्‍यांना नागविले जाते. त्याच्याही चौकशी मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करणार आहे. 

जांभळीकरांची दुकान तपासणी का रखडली?
बाळासाहेब बंडगर म्हणाले, व्यापारी प्रतिनिधी मुजीर जांभळीकर यांच्या तीन फर्मचा सेस 2015-16 मध्ये 3.30 लाख, 2016-17 मध्ये 1.85 लाख, 2017-18 मध्ये 1.23 लाख, 2018-19 मध्ये 1.13 लाख जमा आहे. सेस कमी असल्यावरून जांभळीकर यांच्या दुकानांच्या तपासणीचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळ बैठकीत झाला होता. ती तपासणी का रखडली आहे? 

बंडगर माफी मागा; नाक्यावर सेस वसुली करा: शहा
‘चेंबर’चे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, व्यापारी प्रतिनिधी चोर असून ते लाखो रुपयांचा सेस बुडवतात, असा आरोप करून बंडगर यांनी सर्व व्यापार्‍यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी यासाठी व्यापार बंदचा निर्णय घेतला आहे. पॅकिंग मालावर देशात कुठेही तोलाई घेतली जात नाही. मग सांगलीतच का मागितली जाते. मोर्चा, शंखध्वनी, घोषणाबाजी ही हमालांची दादागिरी कायमचीच आहे. सेस बुडवला जात नाही. तसे वाटत असेल तर नाक्यावरच सेस वसुली करा. प्रकरण कोर्टात असतानाही आंदोलन, मूळ विषयाला बगल देण्याचा प्रकार चुकीचा आहे.