Tue, Aug 11, 2020 20:56होमपेज › Sangli › टक्केवारीविरोधात भीक माँगो आंदोलन

टक्केवारीविरोधात भीक माँगो आंदोलन

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 10:46PMसांगली : प्रतिनिधी

येथील शामरावनगरातील रस्त्यांसह मंजूर विकासकामे अडविल्यावरून सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. महासभेच्यावेळी महापालिके समोरच नागरिकांनी भीक माँगो आंदोलन केले. पदाधिकार्‍यांनी टक्केवारीसाठी निविदा प्रक्रिया रोखल्याचा आरोपही केला. टक्केवारी कोणीही खा, पण कामे होऊ द्या, असा पवित्रा घेत निदर्शने केली. यावेळी गोळा केलेली रक्कम प्रशासनाला भेट देण्याचा प्रयत्न केला. परंतु ती न स्वीकारल्याने नागरिकांनी महापालिकेच्या गेटवर बांधली. 

येथील शामरावनगरात ड्रेनेज खोदाईमुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. यामध्ये महसूल कॉलनी, महादेव कॉलनी, अभिनंदन कॉलनी, मदरसा परिसर, विठ्ठलनगर, आकाशवाणी परिसर, रामनगर, गजानन कॉलनी, आप्पासाहेब पाटीलनगर, हनुमाननगर या वसाहतींचा  समावेश आहे. येथील रस्ते व्हावेत, गटारींसह पाणीपुरवठा आदी सुविधा मिळाव्यात म्हणून नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली. याची दखल घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नांतून शासन निधीतून रस्ते मंजूरही झाले आहेत. परंतु रस्त्याची कामे करण्यापूर्वी ड्रेनेजच्या चरी महापालिकेने मुजवून घ्याव्यात, अशी मागणी केली होती. या चरी मुजविल्याशिवाय रस्ते करणार नाही, असा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी पवित्रा घेतला आहे. त्यापोटी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागालाच 1.25 कोटी रुपये पॅचवर्कसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तसा विषय गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी होता. परंतु स्थायी समितीने हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन विनानिविदा पॅचवर्कचे काम करण्यास विरोध केला. महापालिकेमार्फतच हे काम व्हावे, असा पवित्रा घेतला. 

आता पावसाळा व महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे ही कामे निविदा मंजुरीनुसार प्रक्रियेतून होण्यास विलंब लागेल. त्यासाठी महापौर हारुण शिकलगार यांनी स्थायी समितीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्गच्या विषयास मंजुरीचा आग्रह धरला. परंतु सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी आयुक्‍तांच्या ‘कायद्यानुसार काम’ या तत्वावर बोट ठेवत विषय मंजुरीला नकार दिला. यामुळे सत्ताधार्‍यांतच मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

दरम्यान, महापालिकेमार्फतच ही कामे करण्यामागे पदाधिकार्‍यांतील टक्केवारीचा वाद असल्याची चर्चा आहे. यामुळे मनसेचे शहराध्यक्ष अमर पडळकर, संदीप दळवी, शैलेश पवार, रज्जाक नाईक, सूरज चोपडे आदिंच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेवर धडक मारली. महासभेवेळीच निदर्शने करीत त्यांनी महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला. 

याबाबत अमर पडळकर म्हणाले, कोणीही कामांसाठी टक्केवारी घ्या, पण कामे अडविण्याचा उद्योग खपवून घेणार नाही. पावसाळ्यात पुन्हा दुरवस्था होण्याचा धोका असल्याने कामे अडवू नका. प्रसंगी आम्ही भीक मागून तुम्हाला टक्केवारी देऊ.

संदीप दळवी म्हणाले, ड्रेनेज, केबल खोदाईमुळे संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. आता रस्ते मंजूर असूनही केवळ चरींसाठी रस्ते अडले आहेत. स्थायी आणि महासभेचा वाद  याला कारणीभूत आहे. यामागचे कारणही उघड आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही. शैलेश पवार म्हणाले, पावसाळ्यापूर्वी रस्ते, पाणी सुविधा मिळाल्या नाहीत. तर नागरिकांसमवेत महापालिकेत ठिय्या आंदोलन करू.

Tags : sangli, percentage, against, agitation, sangli news,