Mon, Jul 06, 2020 03:55होमपेज › Sangli › जिल्ह्यात ‘पुन्हा आला’ अवकाळी पाऊस

जिल्ह्यात ‘पुन्हा आला’ अवकाळी पाऊस

Last Updated: Dec 04 2019 1:08AM
सांगली : प्रतिनिधी
जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर अवकाळी पाऊस पडला. यामुळे शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यांत ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर या तालुक्यांतील द्राक्ष, डाळिंब बागा यांना मोठा फटका बसला आहे. औषध फवारणीसाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली आहे. मिरज पश्‍चिम भागातील भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. 

मिरज पूर्व भागात दैना
लिंगनूर : वार्ताहर
मिरज पूर्व भागात पुन्हा अवकाळी पावसाने व ढगाळ हवामानाने द्राक्ष बागांची दैना उडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका पुन्हा बसू लागला आहे.

दि. 29 नोव्हेंबरपासून परिसरातील वातावरण  ढगाळ हवामान झाले आहे. दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी चार आणि रात्री सहा ते आठदरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस पडला. आज पहाटे तीन वाजल्यापासून पावसाने मध्यम ते चांगल्या स्वरूपाची हजेरी लावली. हा पाऊस रब्बी पिकांस पोषक असला  तरी द्राक्ष बागांचा कर्दनकाळ ठरू लागला आहे. आणखी किमान दोन ते तीन दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. 

या पावसामुळे फुलोरा स्थितीतील बागांमध्ये घडांची गळ सुरू होण्याची शक्यता आहे. घड गळून पडल्याने किंवा दोन दिवसांत ते खराब झाल्यास द्राक्ष मणी तयार होण्याअगोदरच त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  तसेच ज्या द्राक्षबागा तीन ते साडेतीन महिने कालावधीत आहेत. त्या बागेतील घडात व  मण्यात पाणी उतरले आहे. हा पाऊस आणि पुन्हा ऊन असे राहिल्यास मणी तडकण्याचीही शक्यता आहे. 

पलूस, कडेगावात ऊस तोडी खोळंबल्या
कडेगाव : शहर प्रतिनिधी
पलूस, कडेगाव तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे. या पावसामुळे द्राक्ष बागासह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.  नुकत्याच सुरू झालेल्या कारखान्याच्या ऊस थोडी खोळंबल्या आहेत.

कडेगाव शहरासह तालुक्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवार पहाटे 4 वाजल्यापासून रिमझिम आणि मध्यम स्वरूपात पावसास सुरुवात झाली.  पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. 

तासगाव तालुक्याला पुन्हा फटका
तासगाव : प्रतिनिधी
परतीच्या मुसळधार पावसातून सहीसलामत सुटलेल्या आणि ऑक्टोबर महिन्यात फळछाटणी झालेल्या तालुक्यातील द्राक्षबागा पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. 

सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे फुलोर्‍यातील तसेच इतर अवस्थेतील बागावर डाऊनीचा हल्ला होण्याची भिती आहे. यामुळे बागायतदारांची दैना उडाली आहे.

निंबळक भागात ढगाळ वातावरण
निंबळक : वार्ताहर
तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे निंबळक, चिखलगोठण, आळते, लिंब, बोरगाव आणि शिरगाव भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. निंबळक भागात बागायतदार वातावरणातील सततच्या बदलाने हैराण आहेत. सकाळी  धुके, दुपारी ढगाळ वातावरण आणि रात्री उष्णता तर दिवसभर वेगाने वाहणारा वारा याचा द्राक्षबागेवर विपरित परिणाम दिसू लागला आहे. शेतकर्‍यांचे औषध फवारणीचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. 

आटपाडीत डाळिंब बागांना फटका 
दिघंची: वार्ताहर
आटपाडी तालुक्यातील दिघंची व परिससरात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री पावसाच्या हलक्या सरी झाल्या. त्यामुळे या परिसरातील डाळिंब बागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तेल्या, बिब्या, कुजवा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच कळ्या, फुले  गळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसणार  आहे. हरभरा, गहू, ज्वारी, मका या पिकांचे नुकसान होणार आहे

कुपवाड, सावळी भागात अवकाळी पाऊस
कुपवाड : वार्ताहर
शहरासह विस्तारित परिसर तसेच ग्रामीण भागातील सावळी, कानडवाडी, तानंग आदी भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने रिपरिप सुरू केली होती. या पावसाने द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त असा पाऊस असला तरी पिकांवर किडींचा पादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.