Sun, Aug 09, 2020 02:45होमपेज › Sangli › शिगावमध्ये युवकाचा खून 

शिगावमध्ये युवकाचा खून 

Last Updated: Oct 09 2019 11:19PM
आष्टा : प्रतिनिधी
पूर्वीच्या भांडणातून शिगाव (ता. वाळवा) येथे मंगळवारी रात्री आठ युवकांच्या एका गटाने चाकू व तलवारीने हल्ला करून एका युवकाचा खून केला. एकाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

अनिकेत ऊर्फ बबलू शिवाजी फार्णे (वय 25, रा. शिगाव, ता. वाळवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र सौरभ संभाजी चव्हाण (18, रा. शिगाव) याच्या पाठीत चाकूचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी शैलेश घाडगे (वय 23), नीलेश घाडगे (21) व विश्‍वास लोंढे (36, तिघेही रा. शिगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली  माहिती अशी : अनिकेत फार्णे व सौरभ चव्हाण दोघे मित्र आहेत. त्यांचे गेल्या वर्षी शिगाव येथील हनुमान यात्रेत शैलेश घाडगे याच्याबरोबर भांडण झाले होते. त्यावेळेपासून तो अनिकेतकडे रागाने बघत होता.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिगाव येथील तरुण भारत चौकात अनिकेत व सौरभ थांबले होते. तेथे आलेल्या उमेश सहदेव चव्हाण याने अनिकेत याला सांगितले की, “तुला शैलेश व नीलेश मारणार आहेत.” त्यामुळे अनिकेत व सौरभ जाब विचारण्यासाठी शैलेश याच्या घरी गेले होते.

तेथे शैलेश, त्याचा भाऊ नीलेश व त्यांचा मामा विश्‍वास लोंढे असे तिघेजण होते. अनिकेत हा शैलेश व नीलेश यांना याबाबत विचारत असताना ते दोघेही घरात पळत गेले. शैलेश चाकू घेऊन तर नीलेश तलवार घेऊन आला. त्यांनी शिवीगाळ करीत अनिकेतवर चाकू व तलवारीने वार केले. विश्‍वास लोंढे याने अनिकेतला धरून ठेवले होते.

मोठा दगड उचलून मारला

अनिकेतला  सोडविण्यासाठी सौरभ गेला असता शैलेशने त्याच्या पाठीत चाकूने वार केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिकेतच्या छातीवर नीलेशने तेथेच पडलेला मोठा दगड उचलून मारला. एवढ्यात तेथे नीलेश चव्हाण, उत्तम फार्णे व अस्लम नदाफ आले. त्यांना पाहून संशयित पळून गेले.

अनिकेतला उपचारासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून निलेशचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. 

सौरभ चव्हाण याने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आष्टा पोलिस स्टेशनचे निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाने   पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढेरे या प्रकरणाचा  तपास करीत आहेत.