'सुदृढ वसुंधरेसाठी स्तनपानाला प्रोत्साहन द्या'

Last Updated: Aug 07 2020 1:17PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र

डॉ. शिशिर मिरगुंडे
अध्यक्ष, कोल्हापूर बालरोगतज्ञ संघटना, 
प्राध्यापक व विभागप्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज


दरवर्षी जगभर एक ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या वर्षीचे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. 'Support breastfeeding for a healthier planet' म्हणजेच 'सुदृढ वसुंधरे करिता स्तनपानाला प्रोत्साहन द्यावे ' असे आहे. 

स्तनपानाचे फायदे 

बाळाकरिता

१) जन्मानंतर आईच्या व बाळाच्या त्वचेचा संपर्क झाल्यामुळे बाळामध्ये तापमान कमी होऊन प्रकृतीला धोका होण्याची शक्यता कमी होते. (Hypothermia prevention )

२) मातेकडून पहिल्या दोन-तीन दिवसात भरवला जाणारा चीक हा बाळाला अत्यंत उपयुक्त रोगप्रतिकारशक्ती मिळवून देतो. याला बाळाचे "पहिले लसीकरण" समजले जाते. यामध्ये जंतूसंसर्गाशी लढण्याकरिता आवश्यक अँटीबॉडीज तसेच बाळासाठी आवश्यक पोषकद्रव्ये असतात.

३) स्तनपान करताना बाळ आणि आईमध्ये एक प्रकारचा मानसिक बंध निर्माण होतो.

४) स्तनपान केल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती तंदुरुस्त होऊन जंतू संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. पहिले सहा महिने फक्त आणि फक्त स्तनपान मिळालेल्या बालकामध्ये जंतूसंसर्ग (उदा. वारंवार ताप येणे, निमोनिया, हगवण, विषाणूसंसर्ग इ.) होण्याचे प्रमाण निश्चितच कमी असते व अशा मुलांमध्ये गंभीर जंतुसंसर्गामुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी असते.

५) पहिले सहा महिने फक्त आणि फक्त स्तनपान मिळालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा निश्चितच अधिक असतो.

मातेकरिता 

१) प्रसूतीनंतर लगेच स्तनपान केल्यास आईला पान्हा फुटण्यास मदत होते. तसेच प्रसुतीपश्चात  रक्तस्त्राव होण्याची शक्यता कमी होते. तसेच होणाऱ्या रक्तस्त्रावावर नियंत्रण करता येते.
२) फक्त आणि फक्त स्तनपान केल्यामुळे आईचा बांधा सुडौल  होतो.
३) स्तनपान केल्यामुळे नैसर्गिक संततिप्रतिबंधक सोय होते.
४) स्तनपान केल्यामुळे आईला स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळते.

समाजाकरिता  फायदे  

१) मातेचे दूध नैसर्गिकरित्या तयार, सतत २४ तास आणि मोफत उपलब्ध असल्याने तसेच बाहेरील दूध उकळून घेण्याकरिता तसेच भांडी स्वच्छ करण्याकरिता करावा लागणारा खर्चाची बचत होते.
२) फक्त आणि फक्त स्तनपान केल्याने शाळांमधील जंतुसंसर्गाचे प्रमाण झाल्याने रुग्णालयीन खर्चाची बचत होते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते. तसेच बालकांच्या आजारपणात  पालकांचा वेळ व खर्च वाचल्यामुळे सुद्धा अर्थव्यवस्था सुधारू शकते.
३) बाहेरील दुधाचा वापर न करता फक्त स्तनपान केल्यामुळे बाहेरील दुधाच्या उकळण्याकरिता  लागणाऱ्या इंधनाची सुद्धा बचत होते.

स्तनपानाचे हे फायदे लक्षात घेता आपण आपला प्लॅनेट निश्चितच सुदृढ बनवू शकतो. म्हणूनच आपण यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपली पृथ्वी सुदृढ बनवण्याचा निग्रह करू.

स्तनपान करताना येऊ शकणारे अडथळे, त्याची कारणे व उपाय 

१) बऱ्याच मातांकडून विशेषतः प्रथम बाळंतपणानंतर कमी दूध असल्याची तक्रार केली जाते. परंतु अनुभवाची कमतरता व आत्मविश्वासाचा अभाव हेच मुख्य कारण असते. दूध कमी असण्याचे इतर कोणतेही कारण क्वचितच आढळते. त्यामुळे आईने बालरोग तज्ञांचा किंवा स्तनपान समुपदेशक यांचे मत घेऊनच स्वतःला दूध कमी असण्याचा निष्कर्ष काढावा. बाळाला दिवसांतून पाच ते सात वेळा शी होत असेल, बाळाचे वजन वयानुसार व वाढीच्या तक्त्यानुसार योग्य असेल, बाळ झाल्यानंतर शांत झोपत असेल, त्याची शी सोनेरी पिवळ्या रंगाची होत असेल तर त्यास निश्चितच दूध पुरेशा प्रमाणात मिळते असा निष्कर्ष काढावा. केवळ बाळ रडते या कारणाकरिता दूध कमी आहे असा निष्कर्ष काढू नये. याची अनेक नैसर्गिक व तात्कालिक कारणे असू शकतात. कोणत्याही कारणाशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पहिल्या सहा महिन्यांत त्याला स्तनपाना व्यतिरिक्त इतर कोणतेही दूध देऊ नये.

२) स्तनपानानंतर बाळाने वारंवार गुळणी काढणे 

स्तनपान करताना बाळाची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. स्तनपान करताना आईने स्वतःला सोईस्कर स्थितीमध्ये बसले पाहिजे व बाळाचे डोके, मान व पाठ एका रेषेत असेल अशा पद्धतीने हातावर घ्यावे व बाळाचे हनुवटी यांच्या व वरचा व खालचा ओठ जास्तीत- जास्त तोंड उघडून बाहेर असले पाहिजेत. तसेच आईच्या स्तनावरील काळा भाग बाळाच्या तोंडात जास्तीत- जास्त असावा व बाळाच्या तोंडाची आईच्या स्तनावरील पकड घट्ट असावी. अशा स्थितीत स्तनपान न केल्यास विशेषतः बाळाची आईच्या स्तनावरील पकड ढिली असल्यास दुधाबरोबर हवासुद्धा ओढली जाते. यामुळे पोटामध्ये गेलेली हवा ढेकराद्वारे बाहेर पडते. त्यावेळी थोडे दूध, दही गुळणीच्या स्वरूपात बाहेर पडते. याकरिता आईने योग्य स्थिती समजावून घेऊन स्तनपान केले पाहिजे. दूध पाजल्यानंतर ढेकर काढून झोपण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

३) स्तनाग्रे दुखणी होणे किंवा इजा होणे

स्तनपानावेळी बाळाची स्थिती चुकीचे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त वेळ चुकीच्या स्थितीत पाजत राहल्यामुळे त्रास होऊ शकतो. स्तनपानावेळी योग्य स्थितीमध्ये स्तनपान केल्यास तक्रार टाळू शकतो. तसेच जास्त प्रमाणात इजा झाली असल्यास मातेच्या दुधाचा वापर करून ही जखम बरी होऊ शकते. आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे वापरावी.

४) स्तनाग्रे बाळ तोंडात घेऊ शकत नसेल तर मातेने परिचारिका अथवा डॉक्टरांच्या मदतीने आपली स्तनाग्रे योग्य आकाराची आहेत अगर नाही तसेच ती सपाट किंवा आतवर रुतले नाहीत ना ( inverted or flat nipples )  याची पडताळणी करून घ्यावी. व त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार करावा. (उदाहरणार्थ syringe च्या साह्याने स्तनाग्रे बाहेर काढणे).

५) स्तनामध्ये जड होणे (breast engorgement) किंवा गळू होणे. (abscess) या तक्रारी टाळण्याकरिता आईने लवकरात- लवकर स्तनपान सुरुवात करायला हवी. तसेच जास्त प्रमाणात दुधाचं प्रमाण असेल तर थोडे दूध पिळून काढले पाहिजे.  कोणत्याही कारणाने बाळाला विलगीकरण केले असेल तरीही दूध पिळून काढले पाहिजे. तरीही जडपणा अथवा ताप येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे अथवा जंतूनाशक औषधांचा वापर गरजेनुसार करावा.

एचआयव्ही संसर्गित मातांनी स्तनपान करावे का ? 
 

एचआयव्ही संसर्गित मातेकडून प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीदरम्यान बाळाला संसर्ग होण्याची शक्यता आजकाल मातेला व बाळाला दिल्या जाणाऱ्या आधुनिक औषधांमुळे अत्यंत कमी म्हणजे चार ते पाच टक्केपर्यंत आहे. तथापि स्तनपान न मिळाल्यामुळे बाळामध्ये निर्माण होणारे कुपोषण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे प्रमाण आपल्यासारख्या प्रगतशील देशामध्ये खूपच जास्त आहे. यास्तव पहिले सहा महिने आई करता दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक तर पहिले सहा महिने फक्त आणि फक्त स्तनपान करावे व बाहेरील कोणत्याही प्रकारचे दूध देऊ नये. अन्यथा पहिल्या दिवसांपासून आईचे दूध न देता फक्त आणि फक्त डब्याचे दूध किंवा गायीचे दूध द्यावे. यातील दुसरा पर्यायामुळे एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी बाहेरील दुधाचा खर्च व दूध उकळून घेणे, भांड्यांचे निर्जंतुकीकरण करणे व सातत्याने स्वच्छता बाळगून दूध बंद करणे या गोष्टी सुद्धा जिकिरीच्या आहेत. यास्तव आईने सर्व बाबींचा सारासार विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. यास्तव आईने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. या दोन पर्यायामुळे आईकडून बाळाला एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. परंतु आईचे दूध व बाहेरील दूध असा संमिश्र पर्याय स्वीकारल्यास एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

सध्याच्या कोरोना साथीमध्ये आई कोरोनाबाधित झाल्यास बाळाला स्तनपान करावे का?

कोरोना साथीच्या सुरुवातीनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच मातांमध्ये कोरोनाबाधित मातेने बाळाला स्तनपान करावे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जागतिक स्तरावरील संस्था "जागतिक आरोग्य संघटना"( WHO ), सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (CDC) या संस्थांनी विविध संशोधनानंतर मात करण्यासाठी प्रोत्साहित करणे विषयी निर्णय घेतलेला आहे. कोरोनाबाधित मातेकडून बाळाला स्तनपान केल्याने कोरोना संसर्ग होऊ शकतो अगर कसे याविषयी संभ्रमता असल्याने व नवजात बाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या रोगाची तीव्रता गंभीर असण्याची शक्यता कमी असल्याने तसेच स्तनपान न दिल्यामुळे निर्माण होणारे गंभीर धोके यांचा सारासार विचार करून कोरोनाबाधित आईला बाळाला स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेच योग्य आहे असे दिसून येते. परंतु मातेने स्तनपान करण्यापूर्वी स्वतःच्या स्तनाची व हातांची स्वच्छता, निगा बाळगूनच पाजवावे तसेच मास्कचा योग्य वापर तसेच शिंकताना, खोकताना योग्य ती काळजी घेणे अनिवार्य आहे.

स्तनपान ऐवजी बाटलीचे दूध देण्याचे काय तोटे आहेत?

बाटलीचे दूध देण्यासाठी बाटलीचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी वाढते व ते करणे अवघड असते. त्यामुळे बाळाला स्तनपान ऐवजी बाटलीने दूध दिल्यास बाळाला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता निश्चितच जास्त राहते. तसेच बाळ बाटलीमधून दूध सहजपणे ओढू शकते. परंतु आईच्या स्तनामधून दूध ओढून घ्यावे लागते. सहजरीत्या मिळणाऱ्या बाटलीच्या दुधाला प्राधान्य देते व आईचे दूध घेतले जात नाही. त्यामुळे एकदा बाटलीच्या दुधाची सवय लागल्यानंतर बाळाला पुन्हा अंगावरचे दूध चालू करणे अवघड बनते. यास्तव चालू करण्याचे टाळणे हाच उत्तम पर्याय आहे. या वस्तुस्थितीमुळे बाटलीला " पुतना मावशी" म्हटले जाते.

नोकरदार महिलांनी (working women) स्तनपान कसे करावे?

नोकरीकरता घराबाहेर पडताना मातेने स्तनपान करावे व जमेल तितके दूध पिळून एका स्वच्छ भांड्यामध्ये बंदिस्तपणे ठेवावे असे दूध नेहमीच्या तापमानाला आठ तास व फ्रिजमध्ये २४  तास सुरक्षित व उपयुक्त राहू शकते.  असे दूध बाळाला पाजताना गरम करून घेण्याची गरज नसते. हे दूध कामावरून परत येईपर्यंत पुरवण्याचा प्रयत्न करावा व नोकरीवरून परत आल्या-आल्या पाजावे. जेणेकरून बाहेरचे दूध वापरण्याची गरज प्रामुख्याने पहिल्या सहा महिन्यात लागू नये याची दक्षता घ्यावी.

मातेने बाळाला दिवसभरात किती वेळा व कशाप्रकारे पाजावे? 

मातेने दिवसातून आठ ते दहा वेळा व रात्री दोन ते तीन वेळा स्तनपान करावे. एका वेळी साधारण वीस मिनिटे स्तनपानाचा कालावधी पुरेसा असतो. एकावेळी एकाच बाजूच्या स्तनाने स्तनपान करावे. अशा पद्धतीमुळे बाळाला पुरेशा प्रमाणात पाणी व पोषण द्रव्ये मिळतात. प्रत्येक वेळी एकाच स्थानाचा वापर न करता आलटून- पालटून करावा. मातेने बाळाला  साधारण २ ते ३ तासांनी पाजणे गरजेचे असले तरी घड्याळाच्या काट्याप्रमाणे पाजणे गरजेचे नसून बाळाच्या मागणीनुसार पाजणे गरजेचे असते. (demand feeding )

कमी दिवसाच्या बाळाला किंवा जुळ्या बाळांना बाहेरचे दूध वापरणे गरजेचे असते का?

नैसर्गिक दृष्ट्या अशा बाळांना योग्य व पुरेसे प्रमाणात दूध मातेकडून उपलब्ध होऊ शकते. यास्तव डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाहेरील दूध अथवा पावडर चालू करणे धोक्याचे ठरू शकते. कमी वजनाच्या बाळांना आईच्या दुधाशिवाय बाहेरचे दूध किंवा पावडरचे दुध दिल्यास आतड्याला गंभीर इजा होऊ शकते. याला पर्याय म्हणून कमी दिवसाच्या बालकांना आईचेच दूध द्यावे किंवा ह्युमन मिल्क बँकेमधून दूध उपलब्ध करावे.

ह्युमन मिल्क बँक ही संकल्पना काय आहे?

बऱ्याचदा काही कारणाने काही बालकांना मातेचे दूध उपलब्ध करणे अशक्य असते. उदाहरणार्थ, प्रसूतीनंतर कोणत्याही कारणाने आईला अतिदक्षता विभागात उपचार करणे भाग पडल्यास किंवा काही कारणास्तव आईंचे दूध बाळाला देणे योग्य नसल्यास उदाहरणार्थ आईला कॅन्सरची औषधे चालू असणे, किंवा कमी वजनाच्या अर्भकांकरिता आईचे दूध कमी पडत असल्यास इत्यादि. अशा परिस्थितीमध्ये इतर स्तनदामातांचे दूध हे पावडरच्या दुधापेक्षा किंवा गाई-म्हशीच्या दुधापेक्षा उपयुक्त व सुरक्षित मानले जाते. याकरिता स्तनदा मातांकडून दूध दान करून संकलन केले जाते. व आवश्यक त्या तपासण्या करून इतर बाळांना पाजणे करिता सुरक्षित आहे याची खात्री करून 'ह्युमन मिल्क बँक' येथे साठवले जाते. हे दूध गरजेनुसार पात्र बाळांना वापरण्यात येते. या संकल्पनेमुळे नवजात अर्भक मृत्यूदर कमी करण्याकरिता निश्चितच मदत होते.