Mon, Aug 03, 2020 15:02होमपेज › Sangli › जागतिक बँकेकडून सांगलीत पाहणी

जागतिक बँकेकडून सांगलीत पाहणी

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 11 2019 12:13AM
सांगली : प्रतिनिधी

सांगलीत पूरग्रस्त भागाची जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या पथकाने मंगळवारी पाहणी केली. पथकाचे प्रमुख जागतिक बँकेचे तुषार चक्रवर्ती यांच्यासह तीनजणांचा पथकात समावेश होता. महापुराचा धोका रोखण्यासाठी उपाययोजना, पाणी, विद्युतपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जॅकवेल, ट्रान्स्फॉर्मर उंच करणे तसेच पूरपट्ट्यातील लोकांचे पुनर्वसन यासाठी 300 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याद्वारे शहर सक्षमीकरण होईल, अशी मागणी या पथकाकडे केल्याचे आयुक्‍त नितीन कापडनीस यांनी सांगितले.

पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि पूरग्रस्त भागात पुनर्वसन यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे पथक पूरग्रस्त भागाचा पंचनामा करीत आहे. 

चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली तीनजणांचे पथक सांगलीत आले होते. त्यांनी कर्नाळ रस्त्यावरील पाणीउपशाचे जॅकवेल, हनुमाननगरातील मलनि:स्सारण केंद्र, पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, सांगलीवाडीतील मंगोबा चौक,  शामरावनगर,  आपत्ती व्यवस्थापन केंद्र आदींची पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला. 

आयुक्‍त नितीन कापडनीस, उपायुक्‍त राजेंद्र तेली, पाणीपुरवठा अभियंता पी. बी. पाटील, नगररचनाकार सौ. मुल्ला, अभियंता सतीश सावंत, वैभव वाघमारे, सुनील पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण कवठेकर, मुख्य अग्‍निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्यासह मनपाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. पाहणीनंतर आमराई क्‍लब येथे आढावा बैठक झाली. बैठकीत पुराचा धोका, त्यावर उपाययोजना आणि पुनर्वसनाबाबत कापडनीस यांनी टीमला माहिती दिली. ते म्हणाले, शहरात पुराच्या कालावधीत पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होते. त्यासाठी जॅकवेल उंच करून पुरातही पाणीपुरवठा अखंडित ठेवणे आवश्यक आहे. पूरपरिस्थितीत  वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पूरपट्टा आणि इतर भागात ट्रान्स्फॉर्मर उंच करावे लागतील.  काही रस्ते उंच  आणि उड्डाणपूल करावे लागतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.

कापडनीस म्हणाले,  ड्रेनेज योजना सक्षम करणे,पावसाच्या पाण्याचा निचरा आणि पूरपट्ट्यातील घरांचे स्थलांतर यासाठी  300 कोटी रुपये आवश्यक आहे. तो निधी जागतिक बँकेने राज्य शासनामार्फत द्यावेत.

आपत्ती व्यवस्थापन केंद्र सक्षम करणे गरजेचे

सांगलीत पाच जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. परंतु अग्निशमन विभागाची इमारत पत्र्यांच्या शेडमध्ये असून, आपत्ती व्यवस्थापन केंद्राला इमारतच नाही. यामुळे या केंद्रासाठी सुसज्ज इमारत, प्रशिक्षण यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रसामग्री, बोटींची गरज आहे. त्याद्वारे आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या सक्षमीकरणासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.