Tue, Jul 07, 2020 08:27होमपेज › Sangli › विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू 

विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू 

Last Updated: Dec 04 2019 1:08AM
मांजर्डे : वार्ताहर
हातनूर (ता. तासगाव) येथील वायरमन रामेश्‍वर केंद्रे (वय 30, मूळ गाव वाघोली, जिल्हा लातूर) यांचा मंगळवारी सकाळी विजेच्या धक्क्याने  मृत्यू झाला. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : हातनूरमध्ये सोमवारी रात्री पाऊस पडला. त्यामुळे वीज गेली होती. मंगळवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वायरमन केंद्रे व अन्य एक कर्मचारी करीत होते. यासाठी त्यांनी वीजपुरवठा बंद केला होता.

केंद्रे गावानजीक असलेल्या उद्यानाजवळील विजेच्या खांबावर  चढले होते. काम सुरू असताना त्यांना विजेचा धक्‍का बसला व ते  खांबावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. ग्रामस्थांनी त्यांना हातनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू  झाला होता.

केंद्रे 2015 पासून महावितरण मध्ये सेवा करीत होते. वीजपुरवठा बंद असूनही त्यांना विजेचा धक्‍का कसा बसला, याबाबत माहिती मिळाली नाही. त्याबद्दलची चौकशी व तपासणी महावितरणचे विद्युत निरीक्षक करणार आहेत.  त्यानंतरच  नेमके कारण स्पष्ट होईल,असे महावितरणचे हातनूर येथील अधिकारी  पाटील यांनी सांगितले.