Mon, Aug 10, 2020 04:38होमपेज › Sangli › वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार ‘सोनहिरा’स जाहीर

वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार ‘सोनहिरा’स जाहीर

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:14AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील साखर कारखान्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (व्हीएसआय)  देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार’ सांगली जिल्ह्यातील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. चालू वर्षापासून ‘कै. आबासाहेब ऊर्फ किसन महादेव वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली असून, हा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.

इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी गळीत हंगाम 2016-17 मधील पुरस्काराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मांजरी येथे व्हीएसआयची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 26 डिसेंबर रोजी  सकाळी साडेदहा वाजता होणार असून, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.   

कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.  कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला आहे. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार सातारा जिल्ह्यातील किसनवीर सातारा सहकारी कारखान्यास जाहीर झाला आहे.

रक्कम रुपये एक लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय ‘ऊस भूषण पुरस्कार’ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथील (ता. हातकणंगले) संभाजी मिसाळ यांना, सांगलीतील ऐतवडे येथील (ता. वाळवा) सुशीला पाटील आणि सातारा जिल्ह्यातील काले येथील (ता. कराड) विकास साळुंखे यांना जाहीर झाला आहे. ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार’ सांगली कडेगाव येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. याशिवाय विभागनिहाय व वैयक्तिक पुरस्कारही जाहीर झालेले आहेत.