Wed, Aug 12, 2020 09:29होमपेज › Sangli › रखडलेले सिंचन प्रकल्प महाआघाडीच्या पापाची स्मारके 

रखडलेले सिंचन प्रकल्प महाआघाडीच्या पापाची स्मारके 

Published On: Apr 22 2019 1:35AM | Last Updated: Apr 21 2019 11:55PM
विटा : वार्ताहर
महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षात सिंचन प्रकल्प रखडले होते. राज्यात पाण्याचा नाही तर नियोजनाचा अभाव होता.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी सरकारच्या काळात रखडलेले सिंचन प्रकल्प हे त्यांच्या पापाची स्मारके होती, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.  आमच्या शासनाने बळीराजा जलसंजीवनी आणि प्रधानमंत्री सिंचाई योजना हाती घेतल्या. आज सिंचन क्षेत्र 21 टक्क्यांनी वाढले  असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा महायुतीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत ते  बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ना. सदाभाऊ खोत, आमदार अनिल बाबर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे समन्वयक मकरंद देशपांडे, अशोकराव गायकवाड, नगरसेवक अमोल बाबर, जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती हर्षवर्धन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, तानाजी पाटील, शंकर मोहिते उपस्थित होते. ते  म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षात सिंचन प्रकल्प रखडले होते. राज्यात पाण्याचा नाही तर नियोजनाचा अभाव होता. आमचे सरकार आल्यावर बळीराजा जलसंजीवनी आणि प्रधानमंत्री सिंचाई योजना हाती घेतल्या. आज सिंचन क्षेत्र 21 टक्क्यांनी वाढले आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे नियोजन तयार आहे.  

ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात मुंबईत हल्ले झाले. त्या सरकारने केवळ वल्गना केल्या. मात्र आमच्या काळात एक खोड काढली तर आम्ही एअर स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना धडा शिकविला. त्यामुळे देशाला आतंकवादी आणि दहशतवाद्यां समोर गुडघे टेकणारे सरकार हवे का मजबूत आणि कणखर सरकार हवे ही ठरविणारी आताची निवडणूक आहे. 

तुम्हाला जेवढे पाणी दिले जाईल तेवढे तुम्ही साखरेचे उत्पादन घेणार हे मला माहिती आहे. त्यामुळे भविष्यात साखर समुद्रात फेकून द्यावी लागेल. ब्राझीलमध्ये सध्या 20 रुपये किलो साखर आहे. आपल्या कडे 35 रुपये दर आहे. सरकारने साखरेला हमीभाव दिला आहे. पैशाचे नाटक करता येत नाही हे लक्षात ठेवा. भविष्यात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करावी लागेल तरच साखर कारखानदारी टिकेल.देशात पाण्याची कमी नाही तर पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. असेही गडकरी म्हणाले.

संजय पाटील म्हणाले, ही निवडणूक लोकसभेची आहे की ग्रामपंचायतीची हेच कळेना. अतिशय खालच्या थराला जाऊन टीका करण्याचा सपाटा लावला.  पाच वर्षात जिल्ह्यात फार मोठी कामे केली आहेत.पाणी योजना मार्गी लावल्या आहेत.नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी  साथ द्या. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू असणार्‍या विशाल पाटील यांनी राजू शेट्टींचे नेतृत्व मानून उमेदवारी करणे बरोबर नाही. सरकारने मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि आर्थिक निकषावरील आरक्षण हे पुढची शंभर वर्षे फायदा होणारे निर्णय घेतले आहेत. गोपीचंद पडळकर याला मुख्यमंत्र्यांनी भरभरून प्रेम दिले. परंतु त्यांनी फितुरी करणे योग्य नाही.
 सदाभाऊ खोत म्हणाले, दुष्काळी भागातील योजना पूर्ण करण्यासाठी संजय  पाटील यांना ताकद द्या. शेतकर्‍यांना दिलासा देणारे हे सरकार आहे. राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करू.             
आमदार अनिल बाबर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या लायकीचे उमेदवार उभारल्यामुळे त्याच पध्दतीने खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी होत आहे. त्यामुळे त्याकडे अजिबात लक्ष देवू नका. विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय आणि गलाई व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे निवडणूक झाली की लगेच एक शिष्टमंडळ घेऊन तुम्हाला भेटणार आहे. आमच्या भागातील यंत्रमागधारक, गलाई व्यावसायिक आणि शेतकर्‍यांना मदत करावी.

काँग्रेसनेच जातीयवाद पेरला...

गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात खूप सिंचन योजना आहेत. प्रकल्प म्हणजे काँग्रेसची स्मारके बनली होती. पंतप्रधान सिंचन योजनेत 26 योजनेचा समावेश केला.कृषी जलसिंचन योजनेतून चांगली कामे झाली. 60 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. टेंभूमुळे दुष्काळी भागातील लाखो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. विटा परिसरातील 50 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. सांगली जिल्ह्यात 7.5 हजार कोटी दिले आहेत. मी खोट बोलणार नाही. 20 हजार किलोमीटर जलमार्ग केला आहे. उसाच्या मळीपासून एथोनॉल तयार करू, साखर तयार करू नका. राजू शेट्टी प्रश्न न समजून घेता आंदोलन करतात.काँग्रेसने जातीयवाद पेरला. समाजाला नवीन दिशा देण्यासाठी भाजपाला साथ द्या. आदर्श खेडी व आदर्श शहरे निर्माण करू.