Fri, Sep 18, 2020 18:38होमपेज › Sangli › इस्लामपुरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण

इस्लामपुरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण

Last Updated: Mar 27 2020 12:01AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात आणखी 3 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामध्ये इस्लामपूर येथील 2 महिला व पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील एका महिलेचा समावेश आहे. या तीनही महिला मिरज सिव्हिलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. इस्लामपूर येथील ‘त्या’  2 महिलांमधील 1 महिला बाधित कुटुंबातील आहे, तर दुसरी इस्लामपूर येथील कामवाली आहे. पेठवडगावची महिला बाधित कुटुंबाची नातेवाईक आहे. जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 3 दिवसांत 12 झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा आरोग्य अधिकारी 
डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी ही माहिती दिली. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबातील व संपर्कातील 11 व्यक्‍तींचे व अन्य एक अशा एकूण 12 व्यक्‍तींच्या नमुने तपासणी अहवालाकडे आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी रात्री उशिरा 11 व्यक्‍तींच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 3 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, तर 8 व्यक्‍तींचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. विदेशातून आलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करणे, विदेशातून आलेल्यांमध्ये किरकोळ लक्षणे आढळली तर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवून नमुने तपासणीला पाठविणे व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यंत्रणा गुंतली होती. मात्र मंगळवारी इस्लामपुरातील 4 व्यक्तींना आणि बुधवारी त्याच कुटुंबातील आणखी 5 व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आणि जिल्ह्यात एकदम घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी आणखी 3 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे धास्ती आणखी वाढली आहे.

कोरोना बाधित 12 पैकी 11 व्यक्ती इस्लामपुरातील असल्याने आरोग्य यंत्रणेने याठिकाणी विशेष लक्ष ठेवले आहे. सर्व यंत्रणा नेटाने कामाला लागली आहे. इस्लामपूर येथे सर्वेक्षणासाठी 10 पथके नियुक्त केली आहेत. बुधवारी 3 हजार 910 घरांचे सर्वेक्षण झाले. गुरुवारी 3 हजार 617 व्यक्तींचे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षण झालेल्यांमध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील 160 बालके व 50 वर्षावरील 674 व्यक्तींचा समावेश आहे. सर्वेक्षण झालेल्यांपैकी एकामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगीसावी यांनी दिली. 

सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 21 व्यक्ती आहेत. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह 12 व्यक्ती आहेत. इस्लामपूर येथील बाधित रुग्णांच्या कुटुंबातील व संपर्कातील हायरिस्क 41 व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्यात अजून लक्षणे आढळली नाहीत.

होम क्‍वारंटाईनमधून 103 व्यक्‍ती बाहेर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, आजअखेर विदेशातून आलेल्या व्यक्‍ती 643 आहेत. त्यापैकी 594 व्यक्‍ती होम क्‍वारंटाईनमध्ये होत्या. त्यातील 103 व्यक्‍तींचा चौदा दिवसांचा होम क्‍वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. सध्या होम क्‍वारंटाईनमध्ये 594 व्यक्‍ती आहेत. आयसोलेशनमधील 12 पैकी 11 व्यक्‍तींचे तपासणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा आले.  त्यातील 3 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. उर्वरित 8 व्यक्‍तींचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत.

 "