Mon, Aug 10, 2020 05:06होमपेज › Sangli › ट्रकचोरी : कर्नाटक पोलिस सांगलीत

ट्रकचोरी : कर्नाटक पोलिस सांगलीत

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:58PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

ट्रकचोरीप्रकरणी अटकेतील चौघांकडे चौकशी करण्यासाठी कर्नाटक पोलिस सांगलीत दाखल दाखल झाले आहेत. या चौघांनी कर्नाटकातूनही ट्रक चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच कर्नाटक पोलिस सांगलीत आले आहेत. त्याशिवाय चेसीस क्रमांकावरून ट्रक मालक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली. 

अनिस चौधरी, मंगू घुणके, आसिफ शेख, परवेज पटेल यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चौधरी व घुणके यांना प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून असिफ शेखच्या मदतीने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय  कोल्हापूर येथील भंगार व्यापारी परवेज पटेल याला चोरी केलेले ट्रकचे स्पेअर पार्ट विकल्याचे सांगितले. त्यानंतर पटेलला दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथे अटक करण्यात आली. 

चौधरी, घुणके व शेख ट्रक चोरी करून त्याचे स्पेअरपार्ट पटेलला विकत होते. एलसीबीच्या पथकाने कोल्हापुरात छापा टाकून एक डंपर, एक ट्रक, दोन चेसीस, तीन इंजिन, 3 डिझेल टाक्या, 3 रेडिएटर, दोन स्टिअरिंग, एक बॅटरी असा बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

दरम्यान, चौघांकडील चौकशीत कर्नाटकातूनही चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत माहिती घेण्यासाठी कागवाड येथील पोलिसांचे एक पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत दाखल झाले आहे. त्याशिवाय निरीक्षक माने यांनी केलेल्या आवाहनानुसार चेसीस क्रमांकावरून ट्रक मालक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधत आहेत.