Sat, Oct 31, 2020 13:55होमपेज › Sangli › आष्टा येथील तीन जणांना मोका 

आष्टा येथील तीन जणांना मोका 

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
आष्टा : पुढारी वृत्तसेवा

येथील उदय मोरे टोळीतील तीन फरारी आरोपींवर मोका कायाद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिली .
तालिब लियाकत मुजावर (वय 23, रा. आष्टा), अजिंक्य अरुण सावळवाडे (20, रा. घोरपडी गल्ली, आष्टा) व सागर  प्रकाश वाघमारे (24, रा. सुतार गल्ली, आष्टा) अशी रविवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी उदय मोरे (34,  रा. आष्टा) व भरत बाळासाहेब  घसघसे (30, रा. आष्टा) यांच्यासह आठ जणांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. 
याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः आष्ट्यातील उदय मोरे टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे, शस्त्रांची तस्करी असे बारा गुन्हे  दाखल आहेत. 

या गुन्ह्यातील आरोपी तालिब मुजावर, अजिंक्य सावळवाडे व सागर वाघमारे यांना इस्लामपूर येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 

याबाबत तासगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आशोक बनकर यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व अतिरिक्त विशेष न्यायाधीश मोका अ‍ॅक्ट पुणे यांच्या न्यायालयात या आरोपींचा जामीन आदेश रद्द होण्यासाठी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा  केला होता. त्यानुसार या न्यायाधीशांनी दि.  8 नोव्हेंबर 2019 रोजी वरील आरोपींचा जामीन रद्द केला होता. त्यावेळपासून ते फरारी होते .

या गुन्ह्याच्या तपास अधिकारी तासगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी  आष्टा पोलिसांना आरोपींचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्रीमती शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे, पोलिस हवालदार अवधूत भाट, राजू पाटील, अमोल शिंदे, अय्याज शेख  यांनी वरील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक केली आहे. 

 "