Mon, Aug 10, 2020 05:16होमपेज › Sangli › तेल्यामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त

तेल्यामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त

Published On: Sep 01 2019 1:50AM | Last Updated: Sep 01 2019 1:50AM

file photoआटपाडी : प्रशांत भंडारे

आटपाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या संकटामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. तालुक्यात डाळिंबाच्या माध्यमातून कृषी क्रांती झाली आहे. तालुक्यातील कोरड्या हवामानात आणि मुरमाड जमिनीत दर्जेदार  डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. 

परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुष्काळ पडला आहे. टेंभूच्या पाण्याने काही भागात पाणी आले आहे. संपूर्ण तालुक्यात मात्र हे पाणी पोहोचलेले नाही. टँकरच्या पाण्यावर बागा जगवल्या  आहेत. आता बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

ऑगस्टमध्ये पहिल्या पंधरवड्यात सलग झालेल्या पावसामुळे तेल्याचे संकट ओढवले आहे. या रोगावर हमखास उपाय नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेणखत, वरखत, छाटणी या खर्चापाठोपाठ तेल्यापासून पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. तेल्यामुळे उत्पादनात होणारी घट आणि वर्षभर वेगवेगळ्या कामांसाठी झालेला खर्च यांचा ताळमेळ नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

दहा फवारण्या केल्या तरी हटत नाही

   * गोंदिरा मळ्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी किरण पाटील म्हणाले, रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणाने तेल्या रोग वाढत चालला आहे. या महिन्यात दहा फवारण्या केल्या तरी तो आटोक्यात आलेला नाही.

   *नेताजी पाटील म्हणाले, शासनातर्फे तेल्यावर संशोधन केले असले तरी  अद्याप हमखास उपाय सापडलेला नाही. तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोठा खर्च होत आहे.